हिवाळी अधिवेशनाच्या कामकासाठी येणाऱ्या पाहुण्यांची जबाबदारी 'लालपरी'वर!
By नरेश डोंगरे | Published: November 30, 2023 02:47 PM2023-11-30T14:47:48+5:302023-11-30T14:55:29+5:30
हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने मंत्रालयातील कर्मचारी मोठ्या संख्येने नागपुरात येतात
नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजाच्या निमित्ताने नागपुरात येणाऱ्या पाहुण्यांची जबाबदारी लालपरीवर आली आहे. त्यासंबंधाने 'ती' कामालाही लागली आहे. हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने मंत्रालयातील कर्मचारी मोठ्या संख्येने नागपुरात येतात. यातील बहुतांश जणांची निवास व्यवस्था सिव्हील लाईन मधील सरकारी वसाहतीत केली जाते. अधिवेशनाच्या कामकाजाच्या निमित्ताने भल्या सकाळी ते विधानभवनात पोहचतात आणि काम संपल्यानंतर आपापल्या निवास व्यवस्थेच्या ठिकाणी जातात.
सकाळपासून उशिरा रात्रीपर्यंत हा क्रम सुरू असतो. यंदाचे हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरपासून सुरू होणार असले तरी मंत्रालयातील विविध विभागाचे कर्मचारी काही दिवसांपूर्वीच नागपुरात पोहचले आहेत. काहींचे आगमन सुरू आहे. त्यांनी आपापल्या विभागाच्या फाईल्स, कागदपत्रांचे गठ्ठेही आणले असून ते 'सेट' करण्याचे काम विधानभवनात सुरू झाले आहे. या सर्वांना निवास्थानाहून विधानभवनात आणण्याची आणि परत नेऊन सोडण्याची जबाबदारी एसटी महामंडळाच्या लालपरीवर सोपविण्यात आली आहे. त्यानुसार, तूर्त ८ बसेस मंत्रालयीन कर्मचाऱ्यांच्या सेवेत गुंतल्या आहेत. २६ नोव्हेंबरपासून त्यांची सेवा सुरू झाली असून, अधिवेशन संपण्यापर्यंत लालपरी ही जबाबदारी पार पाडणार आहे.