दीक्षाभूमीवर निनादला क्रांतीचा नारा ‘जय भीम’; समतेची मशाल घेत देश-विदेशातून दाखल झाला जनसागर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2024 03:50 AM2024-10-13T03:50:32+5:302024-10-13T03:54:08+5:30

‘जय भीम’ हा क्रांतीचा नारा देत भीमसैनिक तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चरणी नतमस्तक झाले.

The revolutionary slogan 'Jai Bheem' was chanted at Diksha Bhoomi; Masses of people came from home and abroad carrying the torch of equality | दीक्षाभूमीवर निनादला क्रांतीचा नारा ‘जय भीम’; समतेची मशाल घेत देश-विदेशातून दाखल झाला जनसागर

दीक्षाभूमीवर निनादला क्रांतीचा नारा ‘जय भीम’; समतेची मशाल घेत देश-विदेशातून दाखल झाला जनसागर

नागपूर : शतकानुशतके धार्मिक व्यवस्थेच्या गुलामगिरीत जखडलेल्या शाेषित, पीडितांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी समता आणि मानवतेचा संदेश देणाऱ्या बौद्ध धम्माची दीक्षा देऊन नवी क्रांती घडविली. त्या ऐतिहासिक घटनेला उजाळा देण्यासाठी महामानवाने मनामनात चेतवलेली समतेची मशाल हाती घेत देश-विदेशातील लाखाेंचा जनसागर शनिवारी दीक्षाभूमीवर अवतरला. ‘जय भीम’ हा क्रांतीचा नारा देत भीमसैनिक तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चरणी नतमस्तक झाले.

हातात पंचशील ध्वज, पांढरा पोशाख, उरात भरलेला प्रचंड आत्मविश्वास घेऊन देशाच्या कानाकोपऱ्यातील खेड्यापाड्यांमधून लाखाे अनुयायी दाेन दिवसांपासून महामानवाला अभिवादन करण्यासाठी दीक्षाभूमीवर पाेहोचत आहेत. त्यामुळे हा संपूर्ण परिसर भीमसैनिकांच्या गर्दीने फुलून गेला आहे. 

विविध कार्यक्रम 
सकाळी धम्म ध्वजारोहणासह समता सैनिक दलाच्या सैनिकांनी दीक्षाभूमी परिसरात पथसंचलन व तथागत बुद्ध व डाॅ. बाबासाहेबांना मानवंदना दिली. 
त्यानंतर दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांच्या नेतृत्वात भिक्खू संघाच्या उपस्थितीत बुद्धवंदना तसेच महापरित्राण पाठ करण्यात आले.
 साेबत २२ प्रतिज्ञांचे पठण करण्यात आले. तसेच देशभरातून आलेल्या इच्छुक नागरिकांनी भिक्खू संघाकडून बौद्ध धम्माची दीक्षा ग्रहण केली.
 दिवसभर लाखाे अनुयायांनी मुख्य स्मारकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेत अभिवादन केले. धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा देश-विदेशातील भिक्खू संघांच्या उपस्थितीत पार पडला.
यंदा प्रथमच मंचावर कुठल्याही राजकीय नेत्याला स्थान दिले नाही. 

‘बाैद्धगया महाविहार मुक्तिसाठी जगातील बाैद्धांनी एकजूट व्हावे’
-नागपूर : काेणत्याही धर्माच्या धर्मस्थळांचे त्याच धर्मीयांकडून संचालन केले जाते. मात्र बिहारमधील बाैद्धगयाचे महाबाेधी विहार बाैद्ध धर्मियांचे तीर्थस्थळ असूनही संचालनावर इतर धर्मियांचा ताबा आहे.

-महाविहार मुक्तिसाठी शंभरपेक्षा अधिक वर्षापासून आंदाेलन सुरू आहे. सरकार शांतीप्रिय बाैद्ध धर्मियांचा अंत पाहत आहे. त्यामुळे जगभरातील बाैद्धांनी गटतटाचा, पंथाचा अहंकार साेडून बाैद्धगया महाविहार मुक्तिसाठी एकजूट हाेण्याची गरज आहे, असे आवाहन ऑल इंडिया बुद्धिस्ट फाेरमचे महासचिव व बाैद्धगया आंदाेलनाचे वाहक अशाेक लामा यांनी केले.

- आज सर्व बाैद्धांनी एकजूट हाेवून लढण्याची गरज आहे, असे आवाहनही त्यांनी केले. धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या साेहळ्यात सायंकाळी ते बोलत होते.
 

Web Title: The revolutionary slogan 'Jai Bheem' was chanted at Diksha Bhoomi; Masses of people came from home and abroad carrying the torch of equality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.