‘टेलिग्राम’ची ‘रिस्क’ पडतेय भारी, वर्षभरात ३३ जणांची लाखोंनी फसवणूक
By योगेश पांडे | Published: October 2, 2023 11:50 AM2023-10-02T11:50:41+5:302023-10-02T11:51:16+5:30
एकतृतीयांश गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश
योगेश पांडे
नागपूर : कोरोनानंतर सायबर गुन्हेगारांनी नागरिकांना लुटण्यासाठी नवनवीन फंडे शोधून काढले असून, मागील काही महिन्यांपासून ‘टेलिग्राम टास्क’च्या नावाने गंडा घालण्याचे प्रकार वाढले आहेत. मागील वर्षभरात अशा प्रकारच्या ‘टास्क’च्या नावाखाली सायबर गुन्हेगारांनी ३३ जणांची फसवणूक केली आहे. यातील एकतृतीयांश गुन्ह्यांचा गुंता सोडविण्यातच पोलिसांना यश आले आहे.
टेलिग्राम टास्कच्या नावाखाली सायबर गुन्हेगार सर्वसाधारणत: शिकल्या सवरलेल्या लोकांभोवतीच जाळे रचतात. त्यांना अगोदर नफा देऊन मग जास्त रक्कम गुंतवायला लावून मग फसवणूक केली जाते. वर्षभरात नागपुरातील ३३ जणांना अशा पद्धतीने जाळ्यात ओढण्यात आले व त्यांची तब्बल ७५ लाख ५१ हजारांनी फसवणूक करण्यात आली. त्यातील ११ प्रकरणे सोडविण्यात पोलिसांना यशदेखील आले व दोन लाख ५९ हजारांची रक्कम परत मिळविण्यात आली. या ११ प्रकरणांपैकी सर्वच गुन्ह्यांतील आरोपींना अटक झालेली नाही. मात्र आठजणांना जेरबंद करण्यात आले आहे. त्यात एक विदेशी नागरिकदेखील समाविष्ट आहे हे विशेष. सायबर गुन्ह्यातील रक्कम परत मिळत नाही, असा समज आहे. मात्र सायबर पोलिसांकडून गुन्हेगाराच्या बँक अकाउंट व टेलिग्राम अकाउंटच्या माध्यमातून त्यांचा माग काढला जात आहे.
अशी असते मोडस ऑपरेंडी
या गुन्हेगारी फंड्यामध्ये आरोपींकडून विशिष्ट फंडा वापरण्यात येतो व त्यादृष्टीने त्यांची प्रक्रिया ‘सेट’ असते. सायबर गुन्हेगारांकडून अगोदर ‘पार्ट टाइम जॉब’चा शोध करणाऱ्यांना विविध माध्यमांतून संपर्क करण्यात येतो. त्यांनी एकदा संबंधित ऑफरमध्ये रुची दाखविली की त्यांना ‘टेलिग्राम’च्या माध्यमातून संपर्क साधत विविध ‘टास्क’ देण्यात येतात. हे ‘टास्क’ सर्वसाधारणत: चित्रपटांना रेटिंग देणे, व्हिडीओ पाहून रेटिंग देणे अशा प्रकारचे असतात. त्यावर संबंधितांना काही पैसे देण्यात येतात. त्यांचा विश्वास बसला की त्यांना जास्त नफ्याचे आमिष दाखवत गुंतवणूक करायला लावण्यात येते. त्यांना सुरुवातीला अपेक्षेपेक्षा जास्त परतावा देण्यात येतो. त्यानंतर जास्त रक्कम गुंतवायला भाग पाडले जाते. नफ्याच्या मोहात लोक रक्कम गुंतवितात व त्यांना फटका बसतो.
अनेक अभियंते शिकार
सायबर गुन्हेगारांच्या या रॅकेटचा सर्वाधिक फटका अभियंत्यांना बसला आहे. कोरोनानंतर अनेक अभियंते वर्क फ्रॉम होम करत आहेत. बराचसा फावला वेळ राहत असल्याने ते पार्ट टाइम जॉबचा शोध करतात. याचाच फायदा गुन्हेगार उचलतात. एखाद्या संकेतस्थळावर त्यांनी सर्च केल्यावर गुन्हेगारांना त्याची माहिती मिळते व संपर्क करण्यात येतो.