आंदोलनातील नायकांसाठी बुद्धिजीवींची भूमिका महत्त्वाची - ताराचंद्र खांडेकर
By आनंद डेकाटे | Published: July 13, 2023 02:53 PM2023-07-13T14:53:01+5:302023-07-13T14:53:22+5:30
स्मृतिशेष एल.आर. बाली यांना श्रद्धांजली
नागपूर : आंदोलनातील नायकांसाठी बुद्धिजीवींची भूमिका महत्त्वाची आहे. आंबेडकरी समाजातील बुद्धिजीवी हा सजग असला पाहिजे. त्याने आंदोलन व आंदोलनातील नायकाची दिशा निश्चित केली पाहिजे. आवळे बाबू, बरि. राजाभाऊ खोब्रागडे, एल. आर. बाली हे आंदोलनाचे बुद्धिजीवी नेता होते. एल. आर.बाली यांच्या जाण्याने मोठी सामाजिक हानी झाली असून संविधानिक मूल्य जोपासणारा समता सैनिक दलाचा समर्पित शिलेदार हरवला आहे, अशी भावना ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत ताराचंद्र खांडेकर यांनी व्यक्त केली.
हिंदी मोरभवनच्या अर्पण सभागृहात स्मृतिशेष एल. आर. बाली यांच्या श्रध्दांजली सभेत ते बोलत होते. आंबेडकराईट मुव्हमेंट ऑफ कल्चर अण्ड लिटरेचर, समता सैनिक दल, रिपब्लिकन लोकप्रतिष्ठान यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ज्येष्ठ पत्रकार प्रा. रणजित मेश्राम, हरिश चहांदे, रिपाइंचे नेते भूपेश थुलकर, नाटककार दादाकांत धनविजय यांनीही आपले विचार व्यक्त केले.
भदंत नागदीपंकर, डॉ. सविता कांबळे, डॉ. सुदेश भोवले, हरिश जानोरकर, डॉ. आर. डी. कोसे, चंद्रबोधी, पाटील यांनी श्रद्धांजलीपर शोक संवेदना व्यक्त केल्या. ज्येष्ठ आंबेडकरवादी विचारवंत डॉ. यशवंत मनोहर यांनी एल. आर. बाली यांच्या कार्य कर्तुत्वाचा आढावा घेणारा पाठविलेला संदेश मच्छिंद्र चोरमारे यांनी वाचला.
- एल.आर. बाली आंबेडकरी चळवळीचे दीपस्तंभ
यावेळी ज्येष्ठ पत्रकार प्रा. रणजित मेश्राम म्हणाले, एल. आर. बालींच्या त्यागाचा आलेख नव्या पिढी समोर मांडला पाहिजे. बालींनी स्वकेंद्रीपणा कधीही स्वीकारला नाही. आंदोलनाला पुरक असणारं लेखन त्यांनी केले. आयुष्यभर निरपेक्ष जगलेले बाली हे आंबेडकरी चळवीचे दीपस्तंभ आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.