‘समृद्धी’च्या प्रचाराची घाई, मानव-वन्यजीव अपघातांचे कारण हाेई

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2023 10:50 AM2023-02-20T10:50:14+5:302023-02-20T10:59:30+5:30

केंद्रीय मंत्रालयाच्या समितीचे ताशेरे : सुरक्षा नियमांचे उल्लंघन करून सुरू केला महामार्ग

The rush to promote 'Samruddhi' Highway is the cause of human-wildlife accidents | ‘समृद्धी’च्या प्रचाराची घाई, मानव-वन्यजीव अपघातांचे कारण हाेई

‘समृद्धी’च्या प्रचाराची घाई, मानव-वन्यजीव अपघातांचे कारण हाेई

Next

नागपूर : सुसाट धावणारा समृद्धी महामार्ग सुरू करण्यासाठी झालेली घाई मानवासह वन्यजीवांच्या जीवावर उठली आहे. केंद्रीय वने, पर्यावरण व हवामान बदल मंत्रालयाच्या क्षेत्रीय सशक्त समिती (आरईसी) ने यावर ताशेरे ओढले आहेत. महामार्गाच्या दाेन्ही बाजूला सुरक्षा भिंत न बांधण्यासह अनेक सुरक्षा मानके अर्धवट साेडून महामार्ग सुरू करण्यात आला, ज्यामुळे दरराेज हाेणाऱ्या अपघातात वन्यजीवांचा व माणसांचाही बळी जात असल्याचे समितीने नमूद केले.

समृद्धी महामार्ग सुरू झाल्यापासून सातत्याने अपघातांचीही मालिका सुरू आहे. साेलापूरमध्ये १२ काळवीटांच्या अपघाती मृत्यूसह दरराेज एक ना एक प्राण्याचा महामार्गावर बळी जात आहे. याची दखल घेत अशासकीय सदस्य प्रा. सुरेश चाेपणे, एआयजीएफचे सी. बी. ताशिलदार, तांत्रिक अधिकारी एन. के. डिमरी हे सदस्य असलेल्या आरईसीद्वारे नुकतीच बैठक घेण्यात आली. यावेळी राज्याचे पीसीसीएफ (वन्यजीव) महीप गुप्ता, सीसीएफ पुणे एन. आर. प्रवीण, नाेडल अधिकारी नरेश झुरमुरे, साेलापूरचे डिसीएफ धैर्यशील पाटील, डब्ल्यूआयआयचे वैज्ञानिक डाॅ. बिलाल हबीब तसेच एमएसआरडीसी व एनएचएआयचे अधिकारी उपस्थित हाेते. समितीने या बैठकीचा अहवाल केंद्रीय मंत्रालयाला सादर केला आहे. मंत्रालयाच्या वेबसाईटवरील अहवालानुसार समितीने तीन वर्षांपूर्वी समृद्धी महामार्गासाठी परवानगी देताना वन्यजीव संरक्षणाबाबतच्या उपाययाेजना करण्याच्या सूचना दिल्या हाेत्या. मात्र, या उपाययाेजना न करता वन्यजीव सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याचा आराेप समितीने केला आहे.

महामार्ग सुरू करण्यापूर्वी दाेन्ही बाजूला सुरक्षा भिंत तयार करणे, वन्यजीवांसाठी अंडरपास, ओव्हरपास याेग्य पद्धतीने तयार करणे, महामार्गावर थाेड्या थाेड्या अंतरावर वैद्यकीय सुविधा उपलब्ध करणे अशा अनेक सूचना केल्या हाेत्या. मात्र, एमएसआरडीसी किंवा एनएचएआयने यातील बहुतेक सूचना पूर्णच केल्या नाहीत. सुरक्षा भिंत नसल्याने वन्यप्राणी महामार्गावर येतात व अपघातांचे बळी ठरतात.

वाहनचालकांनाही धाेका हाेत आहे. साेलापूर जिल्ह्यात वनक्षेत्रातून बनविलेला ओव्हरपास सदाेष असल्याचेही आढळून आले आहे. समितीने तातडीने सुरक्षा भिंत तयार करण्यासह साेलापूर ओव्हरपास दुरुस्ती करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच पीसीसीएफ यांनी अपघाताच्या ठिकाणी भेट देऊन सीसीएफकडून अहवाल घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

तीन महिन्यांत सुरक्षा भिंत

आरईसीने ताशेरे ओढल्यानंतर एमएसआरडीसीने येत्या तीन महिन्यांत महामार्गाच्या दाेन्ही बाजूला सुरक्षा भिंतीचे काम पूर्ण करण्याचा शब्द दिला आहे. तसेच साेलापूर सुधारित ओव्हरपासचे कामही तातडीने करण्यात येईल, असे एनएचएआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

आरईसी, केंद्रीय व राज्य वन्यजीव मंडळ किंवा इतर शासकीय संस्था परवानगी दिल्यानंतर व महामार्ग सुरू झाल्यानंतर पुढचा मागाेवा घेत नाही किंवा अंमलबजावणी संस्था दिलेल्या सूचनांचे पालन करीत नाही. यावेळी प्राण्यांचे मृत्यू हाेत असल्याने आरईसीने पहिल्यांदा मागाेवा घेत बैठक बाेलावली हाेती व मानव-वन्यजीवांचे अपघात राेखण्यासाठी उपाययाेजना करण्याच्या सूचना केल्या आहेत.

- प्रा. सुरेश चाेपणे, सदस्य, आरईसी, एमओएफईसीसी.

Web Title: The rush to promote 'Samruddhi' Highway is the cause of human-wildlife accidents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.