"संघासाठी कुठलीही व्यक्ती नव्हे भगवा ध्वजच आदर्श"
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2023 10:17 PM2023-01-12T22:17:33+5:302023-01-12T22:18:14+5:30
Nagpur News संघ व स्वयंसेवकांसाठी कुठलीही व्यक्ती नव्हे तर भगवा ध्वजच आदर्श आहे, असे प्रतिपादन सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी केले.
नागपूर : कुठल्याही कार्यात निर्गुण उपासना करणे व तत्वाला आदर्श मानून चालणे ही अतिशय कठीण बाब आहे. मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून हे कार्य मागील नऊ दशकांपासून सुरू आहे. संघ व स्वयंसेवकांसाठी कुठलीही व्यक्ती नव्हे तर भगवा ध्वजच आदर्श आहे, असे प्रतिपादन सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी केले. स्वामी विवेकानंद यांच्या १६० व्या जयंतीनिमित्ती शहरातील बाल स्वयंसेवकांच्या ‘नवोन्मेष’ या शारीरिक प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
यशवंत स्टेडियम येथे आयोजित या कार्यक्रमाला विदर्भ प्रांत संघचालक राम हरकरे, महानगर संघचालक राजेश लोया, सहसंघचालक श्रीधर गाडगे प्रामुख्याने उपस्थित होते. आजच्या काळात अनेकांना सगुण उपानसेची आवश्यकता भासते. असे असेल तर बालकांनी हनुमान व छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवायला हवा. कुठलेही काम करत असताना ते देशासाठी करत आहे अशी भावना असेल तर सामर्थ्य वाढते. तर डोक्यात स्वार्थ असला तर शक्ती कधीच वाढत नाही. लहान मुले हे देशाचे भविष्य आहेत. त्यांनी मती, दृष्टी यांच्यासह योग्य बुद्धी व आवश्यक दक्षता बाळगायला हवी. कुठलेही काम करताना त्यात अहंकार येऊ नये हाच प्रयत्न असायला हवा. देशासाठीच कमविणे व देशासाठीच त्याग करणे अशी भावना जोपासायला हवी, असे सरसंघचालक म्हणाले.
नवीन पिढी देशाला शंभर पट मोठे करेल
अशाप्रकारच्या आयोजनांमधून लहान मुलांमध्ये देशप्रेमाचा भाव जागृत करता येऊ शकतो. त्यांना आतापासूनच मोठे उद्दीष्ट दिले तर निश्चितच देश आणखी वेगाने प्रगती करेल. आताच्या पिढीची कार्यक्षमता लक्षात घेता हीच बालके देशाला शंभर पट मोठे करतील, असा विश्वास सरसंघचालकांनी व्यक्त केला.
शिस्त व संस्कारांचे लयबद्ध प्रदर्शन
दरम्यान, कार्यक्रमात बाल स्वयंसेवकांनी शिस्त व संस्कारांचे लयबद्ध प्रदर्शन घडविले. विशेषत: मशाली हातात घेऊन स्वयंसेवकांनी केलेले योग पारणे फेडणारे होते. तसेच मानवी मनोरे रचत स्वयंसेवकांनी कृष्ण आयुष्याचे चित्रणच मांडले. यात कालियामर्दन, कृष्ण जन्म, गोवर्धन पर्वत, विश्वरूपदर्शन इत्यादींचे सादरीकरण करण्यात आले. याशिवाय संचलन, घोषवादनदेखील झाले. यावेळी शाळांचे मुख्याध्यापक, पालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.