‘हल्दीराम’च्या विक्रीची चर्चा जोरात; कुटुंबीयांकडून इन्कार
By मोरेश्वर मानापुरे | Published: May 21, 2024 08:28 PM2024-05-21T20:28:17+5:302024-05-21T20:33:56+5:30
हल्दीराम कंपनी नागपुरातील अग्रवाल कुटुंबीयांच्या मालकीची आहे. गेल्यावर्षी सप्टेंबरपासून हल्दीराम कंपनी विकल्याच्या बातम्या येत होत्या.
नागपूर : भारतातील प्रसिद्ध स्रॅक्स ब्रँड हल्दीराम कंपनीच्या विक्रीची चर्चा पुन्हा जोरात सुरू झाली आहे. नवीन पिढीला या व्यवसायात रस नसल्यामुळे कंपनीची विक्री करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे कंपनीचे संचालक सुशील अग्रवाल यांनी हल्दीरामच्या विक्रीचा इन्कार केला आणि ही केवळ अफवा असून या वृत्तावर लोकांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले.
हल्दीराम कंपनी नागपुरातील अग्रवाल कुटुंबीयांच्या मालकीची आहे. गेल्यावर्षी सप्टेंबरपासून हल्दीराम कंपनी विकल्याच्या बातम्या येत होत्या. त्यानंतर टाटा कंज्युमरने हल्दीराममधील ५१ टक्के हिस्सा खरेदी केल्याचीही चर्चा होती. सध्या ‘अबूधाबी इन्व्हेस्टमेंट अथॉरिटी आणि जीआयसी सिंगापूर’सह जगातील सर्वात मोठी खासगी इक्विटी फर्म ब्लॅकस्टोन हल्दीरामधील ७४ ते ७६ टक्के हिस्सा विकत घेणार असल्याची चर्चा जोरात सुरू आहे. त्यांनी हल्दीराम कंपनीचे मूल्य सुमारे ७० हजार कोटी रुपये केले आहे. तर दुसरीकडे अग्रवाल कुटुंब या मूल्यांकनावर खूश नसल्याने कंपनीच्या विक्रीचा इन्कार करीत असल्याचे सूत्रांचे मत आहे. गेल्या आठवड्याच्या अखेरीस कन्सोर्टियमने हल्दीराम स्रॅक्स फूड प्रायव्हेट लिमिटेड (एचएसएफपीएल) मधील हिस्सा खरेदी करण्यासाठी बोली लावल्याची माहिती आहे.
हल्दीराम या कंपनीचा मोठा इतिहास आहे. ८७ वर्षांची हल्दीराम ही भारतातील सर्वात मोठी स्रॅक्स आणि सुविधा देणारी कंपनी आहे. ब्लॅकस्टोन आणि त्याच्या भागीदारांना हल्दीरामधील ७४ ते ७६ टक्के हिस्सा खरेदी करण्यात रस आहे. त्याचे मूल्य ८ ते ८.५ अब्ज डॉलर्स अर्थात ६६,४०० ते ७०,५०० कोटी ठेवल्याचे सूत्रांनी सांगितले.
कोणत्याही कंपनीकडून अधिकृत वक्तव्य नाही
ब्लॅकस्टोनने दिलेला हा प्रस्ताव मंजूर झाल्यास ब्लॅकस्टोनची भारतातील सर्वात मोठी खरेदी असणार आहे. मात्र, या संपूर्ण प्रकरणी आतापर्यंत कोणत्याही कंपनीकडून अधिकृत वक्तव्य आलेले नाही. हल्दीरामच्या नागपूर आणि दिल्लीतील व्यवसायांच्या विलीनीकरणावर या कराराचे यश अवलंबून असेल. विलीनीकरणाला सीसीआयने आधीच मान्यता दिली आहे. ब्लॅकस्टोन या डीलबद्दल खूप उत्सुक असल्याचे सूत्रांनी सांगितले.
सन १९३७ मध्ये हल्दीराम ब्रँडची सुरुवात
गंगाबिसन यांनी १९३७ मध्ये हल्दीराम ब्रँड सुरू केला. सध्या कंपनीचा १०० हून अधिक देशांमध्ये व्यवसाय आहे. हल्दीराम सुमारे ४०० प्रकारच्या खाद्यपदार्थांची विक्री करतात. यामध्ये स्रॅक्स, नमकीन, मिठाई, फ्रोझन फूड, बिस्किटे, रेडी टू ड्रिंक बेव्हरेजेस, पास्ता, कन्फेक्शनरी आणि रेड टू इट फूड यांचा समावेश आहे. कंपनी आपली उत्पादने अमेरिका आणि युरोपमधील अनेक देशांमध्ये निर्यात करते. हल्दीराम कुटुंबाच्या व्यवहारात, हल्दीराम स्नॅक्स आणि हल्दीराम फूड इंटरनॅशनलच्या एफएमसीजी व्यवसायाचे गेल्यावर्षी विलीनीकरण करून हल्दीराम फूड्स नावाची नवीन कंपनी स्थापन करण्यात आली आहे.