‘तिळगुळ घ्या, गोड गोड बोला’; नागपूरकरांचा सण उत्साहात
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2024 06:53 PM2024-01-15T18:53:19+5:302024-01-15T18:58:23+5:30
महिलांचे हळदी-कुंकू, पुरुषांचे ‘ओ... कोट’ जोरात : मंदिरातही रांगा.
निशांत वानखेडे, नागपूर : नवीन वर्षातील पहिला सण असलेला मकर संक्रांत नागपूरकरांनी उत्साहात व तेवढाच संयमात साजरा केला. ऊर्जा, उत्साह व समृद्धीचा सण मकर संक्रांतनिमित्त लोकांनी ‘तिळगुळ घ्या, गोड गोड बोला...’ म्हणत एकमेकांना शुभेच्छा दिल्या. महिलांनी एकमेकींना हळदी-कुंकू लावून वान वाटत, सुवासिनींच्या ओट्या भरून आनंद साजरा केला तर मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत पुरुषांनी जोशात पतंग उडवित ‘ओ... काट’ च्या आरोळ्यांनी आकाश निनादले. दरम्यान शहरातील विविध भागातील मंदिरातही दर्शनासाठी रांगा होत्या.
मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य धनू राशीतून मकर राशीत प्रवेश करतो व उत्तरायण सुरू होते. त्यानिमित्त सूर्याची पूजा केली जाते. तांदूळ व काळ्या उळदाची खिचडी, काळ्या तीळापासून बनलेल्या वस्तू, तीळगुळ, लाेकरीचे कपडे, देशी तूप, तेल, शेंगदाणे, अन्न व धनदान केले जाते. देशभरात वेगवेगळ्या नावाने हा सण साजरा केला जाताे. आजूबाजूच्या महिलांनी एकत्रित येत हळदीकुंकू, तिळगुळाची देवाणघेवाण करीत एकमेकांना अभिवादन केले. आपल्या सौभाग्यासाठी प्रार्थना केली. महाराष्ट्रामध्ये मकर संक्रांतीला हळदीकुंकू हा एक सामाजिक आणि सांस्कृतिक सण देखील मानला जातो. संक्रांतीपासून रात्रीचा अवधी कमी होऊन दिवस तीळ, तीळ वाढत जातो. थंडी कमी होते. त्यामुळे परस्परांना तीळगूळ देऊन स्नेहाचे बंधन दृढ करण्याचा हा सण नागपुरात उत्साहात साजरा झाला.
आकाशात काटाकाटीचे युद्ध
संक्रांत म्हणजे पतंग महोत्सवही असतो. गुजरातप्रमाणे महाराष्ट्रातही आता संक्रांतीला पतंग उडविणे ही एक लोकप्रिय परंपरा झाली आहे. पतंगशौकिनांनी एक महिन्यापासून पतंग उडवायची तयारी केली होती. काहींनी घरीच पतंग व मांजा तयार केला होता, तर काहींनी रेडिमेडवर आपली हौस भागवली. सकाळपासून आकाशात पतंग दिसू लागले होते. दुपारनंतर पतंगांची गर्दी वाढून काटाकाटी सुरू झाली. काही ठिकाणी गच्चीवर सीडी प्लेअर लावून गाण्यांच्या साथीने पतंग उडवले जात होते. दिवसभर कापलेली व आकाशातून गिरक्या घेत पडणारी पतंग लुटण्यासाठी मुलांपासून थाेरामाेठ्यांचीही गल्लाेगल्लीत धावाधाव दिसून आली. जिकडे तिकडे ‘ओ... काेट’ च्या आराेळ्या ऐकू येत हाेत्या. विविध रंगछटांच्या, विविध आकारांच्या पतंगांचे युद्ध सायंकाळी उशिरापर्यंत रंगले होते.
मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी
मकर संक्रातीला धार्मिक महत्त्वही आहे. सूर्य देवाची पूजा करण्यासह नागरिकांनी वेगवेगळ्या मंदिरातही दर्शनासाठी गर्दी केली हाेती. गणेश टेकडी, साई मंदिर, विठ्ठल मंदिर व इतर मंदिरांमध्ये लाेकांच्या रांगा लागल्या हाेत्या. यात महिलांची गर्दी अधिक होती. सुवासीनींनी आपल्या सौभाग्यासाठी प्रार्थना केली. निरोगी आयुष्यासाठी प्रार्थना केली. तसेच ईश्वराची प्रार्थना करून, आरोग्य, समृद्धी लाभावी यासाठी आशीर्वाद मागितला.
आता दिवस मोठा होईल
मकर संक्रांतीला अध्यात्मिक महत्त्वासह शास्त्रीय महत्त्वही आहे. सूर्य धनू राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. म्हणजे दक्षिण ध्रुवाकडून उत्तर ध्रुवाकडे सरकत जातो, ज्याला उत्तरायण देखील म्हटले जाते. मकर संक्रांतीपूर्वी रात्र मोठी असते व दिवस लहान असतो. या दिवसानंतर दिवस आणि रात्र समान होतात व पुढे दिवस तीळ तीळ वाढत जातो व थंडी कमी कमी होत जाते.