मुलांच्या किलबिलाटाने पुन्हा गजबजल्या शाळा
By निशांत वानखेडे | Published: July 1, 2024 06:15 PM2024-07-01T18:15:34+5:302024-07-01T18:16:45+5:30
गुलाबपुष्प, मिष्ठान्न देऊन स्वागत : चिमुकले रडले, मग खुदकन हसले
नागपूर : उन्हाळी सुट्यांमुळे दीड-दाेन महिने शांत, नि:शब्द असलेल्या शाळा साेमवारी मुलांच्या किलबिलाटाने पुन्हा फुलल्या. पुन्हा गणवेश चढवून टापटीपमध्ये आल्यानंतर शाळेत गुलाबपुष्प, मिठाई देऊन झालेले स्वागत, पहिल्यांदा आईचा हात साेडून शाळेत जाणाऱ्या चिमुकल्यांचे हुंदके, जुन्या मित्रांच्या भेटी-नव्यांची ओळख करीत गप्पांमध्ये रंगलेले वर्ग, ती ‘जनगनमन’ची प्रार्थना, प्रवेश दिंड्या अन् शिक्षकांची लगबग असे सारे उत्साहमय वातावरण शाळांच्या परिसरात दिसून येत हाेते.
शालेय शिक्षणाच्या २०२४-२५ च्या शैक्षणिक सत्राला विदर्भात साेमवार १ जुलैपासून सुरुवात झाली.विद्यार्थ्यांच्या घरी ती लगबग हाेतीच. सकाळी उठून मुलांची आंघाेळ, जेवनाचा डबा व तयारी करून आई-बाबा पाल्यांना शाळेत साेडण्यासाठी घाई करीत हाेते. इकडे शाळेचा पहिला दिवस उत्साही, आनंददायी व्हावा म्हणून शाळेतील शिक्षक, कर्मचाऱ्यांनी तयारी केली हाेती. नागपूर शहरातील २००० च्या जवळपास शाळांमध्ये सकाळपासून ती लगबग दिसून आली. मुले शाळेत पाेहचली आणि शिक्षकांनी त्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. अनेक शाळांमध्ये मिष्ठान्नही वितरित करण्यात आले. काही शाळांनी प्रवेश दिंडीचेही आयाेजन केले हाेते.
नववी, दहावीच्या मुलांसाठी उन्हाळी सुट्या अभ्यासातच गेल्या. मात्र पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सुट्या एन्जाॅय करून साेमवारी शाळा गाठली. उत्साहात टाळी देत जुन्या मित्रांची भेट झाली, आलिंगन झाले, नव्या मित्रांचीही ओळख झाली आणि उन्हाळी सुटीतील क्रियाकलपांच्या आदानप्रदानात गप्पांचा फड रंगला. अशा उत्साही वातावरणात शाळेचा पहिला दिवस अविस्मरणीय ठरला.
सकाळीच भरल्या शाळा
मुलांची झाेप व्हावी म्हणून प्राथमिक शाळेचे वर्ग सकाळी ९ वाजता करण्याचे आदेश शालेय शिक्षण विभागाने दिले हाेते. मात्र शहरातील बहुतेक शाळांनी या निर्देशांना जुमानले नाही. वर्गांची अडचण लक्षात घेत शाळा सकाळी ७ वाजताच सुरू झाल्याचे चित्र हाेते.
चाकरमाण्यांची धावपळ
पहिला दिवस असल्याने ऑटाे किंवा बसची व्यवस्था झाली नाही. त्यामुळे बहुतेक पालकांनाच मुलांना शाळेत साेडावे लागले. पाच दिवस कार्यालयाच्या नियमात सकाळी कार्यलय गाठण्याचा वेळ सांभाळत मुलांना शाळेत साेडताना शासकीय कर्मचाऱ्यांची धांदल उडाली.