‘वारयंत्रा'तून उलगडणार आठवड्याच्या ‘सात वारां’मागील विज्ञान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2023 08:00 AM2023-03-02T08:00:00+5:302023-03-02T08:00:11+5:30
Nagpur News हिंगणा तालुक्यातील कान्हाेलीबारास्थित श्रीक्षेत्र चक्रवर्तीनगरी चाैकी येथे २०१९ साली आर्यभट्ट ॲस्ट्रानाॅमी पार्क व श्री शनिशक्तीपीठाची स्थापना करण्यात आली. या पार्कमध्ये सूर्य घड्याळानंतर आता ‘वार यंत्र’ची भर पडली आहे.
नागपूर : हिंगणा तालुक्यातील कान्हाेलीबारास्थित श्रीक्षेत्र चक्रवर्तीनगरी चाैकी येथे २०१९ साली आर्यभट्ट ॲस्ट्रानाॅमी पार्क व श्री शनिशक्तीपीठाची स्थापना करण्यात आली. या पार्कमध्ये सूर्य घड्याळानंतर आता ‘वार यंत्र’ची भर पडली आहे. स्कंध पुराणात वर्णित गुरू बृहस्पती परिक्षेत्रात निर्मित या वार यंत्रातून आठवड्यातील सात वारांची सुरुवात कशी झाली, त्यामागचे विज्ञान काय आहे, याची माहिती उलगडायला मदत हाेईल.
गुरुवारी २ मार्च राेजी सकाळी १० वाजता सरसंघचालक माेहन भागवत यांच्या हस्ते पार्कमध्ये निर्मित या वार यंत्राचे लाेकार्पण हाेणार असल्याची माहिती आचार्य भूपेश गाडगे यांनी दिली. सात वारांची माहिती कुठून, कशी झाली हे सांगितले जात नाही किंवा अभ्यासक्रमातही शिकविले जात नाही. अमेरिका, युराेपमध्ये हे प्रगत व अगाढ ज्ञान जसेच्या तसे वापरले जाते; पण त्यामागे असलेली वैज्ञानिक भूमिका सांगितली जात नाही. ही माहिती लाेकांसमाेर ठेवण्यासाठी या यंत्राची निर्मिती करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यासह कालगणनेसाठी सर्वांत अचूक मानले जाणारे तीथी यंत्रसुद्धा येथे स्थापित करण्यात आले आहे. ऋषिमुनींनी चंद्राच्या आधारावर कालगणनेची रचना केली हाेती. त्याचप्रकारे चंद्राच्या भ्रमणानुसार हे यंत्र स्थापित करण्यात आले आहे.
आर्यभट्ट पार्कमध्ये यापूर्वी भारतातील सर्वांत माेठे सूर्य घड्याळ तसेच चार फूट रूंद व चार फूट लांब बसाल्ट दगडावर काेरलेले ३३०० किलाे वजनाचे देशातील सर्वांत माेठे श्री यंत्र, अचूक कालनिर्णय दाखविणारे भारतातील पहिले तिथी यंत्र व नक्षत्र यंत्राची प्रतिस्थापना करण्यात आली आहे. ही सर्व प्राचीन विज्ञान समजून घेण्याची व्यवस्था आर्यभट्ट पार्कमध्ये करण्यात आली आहे. आपल्या ऋषिमुनींनी हजाराे वर्षापूर्वी केलेले संशाेधन दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचे गाडगे म्हणाले. गुरुवारी हाेणाऱ्या कार्यक्रमात तेलंगणा येथील उद्याेजक काेठा जयपाल, पटियाला येथील बिरदविंदर सिंह, शम्मी सिद्धू, व्हीएनआयटीचे संचालक डाॅ. प्रमाेद पडाेळे, प्रा. दिलीप पेशवे तसेच वार यंत्रावर काम करणाऱ्या प्राध्यापकांची टीम प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे.
हे यंत्र वैदिक खगाेलशास्त्राच्या आधारे तयार केले आहे. भारतात जंतरमंतर, जयपूर येथे राजा जयसिंह यांनी कालगणनेची अचूक वेधशाळा तयार केली हाेती. त्यानंतर असे प्रयत्न झाले नाहीत. वैदिक तत्त्वज्ञान लाेकांपुढे यावे, हा आर्यभट्ट ॲस्ट्रानाॅमी पार्क बनविण्यामागचा उद्देश आहे.
- आचार्य भूपेश गाडगे