नक्षल्यांच्या गुहेत गृहमंत्री फडणवीसांचा दाैरा; माओवाद्यांची प्रेसनोट सर्वत्र व्हायरल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2023 08:29 PM2023-04-29T20:29:00+5:302023-04-29T21:04:34+5:30

Nagpur News देशभरातील नक्षल प्रभावित क्षेत्रात सुरक्षा यंत्रणांनी बंदोबस्त अत्यंत कडक केला असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस २ मे रोजी नक्षल्यांच्या गुहेत (गडचिरोली जिल्ह्यात) दाैऱ्यावर जाणार आहेत.

The scope of Home Minister Fadnavis in the cave of Naxalites | नक्षल्यांच्या गुहेत गृहमंत्री फडणवीसांचा दाैरा; माओवाद्यांची प्रेसनोट सर्वत्र व्हायरल

नक्षल्यांच्या गुहेत गृहमंत्री फडणवीसांचा दाैरा; माओवाद्यांची प्रेसनोट सर्वत्र व्हायरल

googlenewsNext

नरेश डोंगरे
नागपूर : दंतेवाड्यातील जंगलात शक्तीशाली भू-सुरंग स्फोट घडवून ११ जवानांचे बळी घेणारा घातपात नक्सल नेता जगदीश उर्फ बबरा कोरामी आणि त्याच्या साथीदारांनी घडविल्याचे पुढे आले आहे. या संबंधाने माओवाद्यांनी जारी केलेली प्रेसनोट सर्वत्र व्हायरल होत आहे. दरम्यान, या भयावह घटनेमुळे देशभरातील नक्षल प्रभावित क्षेत्रात सुरक्षा यंत्रणांनी बंदोबस्त अत्यंत कडक केला असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस २ मे रोजी नक्षल्यांच्या गुहेत (गडचिरोली जिल्ह्यात) दाैऱ्यावर जाणार आहेत.


महाराष्ट्रातील नक्षलवादी चळवळीचा नेता मिलिंद तेलतुंबडे याला पोलिसांनी चकमकीत ठार मारल्यानंतर गडचिरोली-गोंदियातील नक्षल चळवळ बॅकफूटवर गेल्याचा दावा होतो. मात्र, या दोन्ही जिल्ह्यात अधूनमधून नक्षलवाद्यांच्या कुरापती सुरूच असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर, २६ एप्रिलला छत्तीसगडमधील अरनपूर (दंतेवाडा) जंगलात नक्षल्यांनी इम्प्रोवाइज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाईस (आयईडी )चा वापर करून शक्तीशाली स्फोट घडवला. यात जोगा सोढी, संतोष तामो, मुन्नाराम कडोती, दुलगो मडावी, जोगा कवासी, हरिराम मडावी, लखमू मडकाम, राजू राम करटम, जयराम पोडियाम, जगदीश कवासी आणि धनिराम यादव हे शहिद झाले. यातील जोगा सोढी, मुन्ना कडोती, हरिराम मडावी, जोगा कवासी आणि राजू करटम हे पाच जवान काही वर्षांपूर्वी शासनाच्या आत्मसमर्पण योजनेत सहभागी झाले होते. त्यानंतर त्यांचे पुनर्वसन करण्याच्या हेतूने त्यांना पोलीस दलात नक्षल विरोधी अभियानात सहभागी करून घेण्यात आले होते, हे विशेष !


या घातपाती कृत्यामुळे ठिकठिकाणच्या नक्षल प्रभावित क्षेत्रातील सुरक्षा यंत्रणांना जबर हादरा बसला आहे. या पार्श्वभूमीवर, एकीकडे नक्षलवाद्यांच्या दरभा डिविजन कमिटीचा सचिव साईनाथ याने जारी केलेली प्रेसनोट सर्वत्र व्हायरल होत आहे. दुसरीकडे सुरक्षा यंत्रणांनीही नक्षल्यांना धडा शिकविण्यासाठी कंबर कसली आहे. अशा वातावरणात गृहमंत्री फडणवीस २ मे रोजी गडचिरोली जिल्ह्यात दाैऱ्यावर जाणार असून त्यांचे ठिकठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.

सुरक्षा यंत्रणा हायअलर्ट
दंतेवाडा जिल्ह्यात नक्षल्यांनी घडविलेल्या भयंकर घातपाती घटनेने गडचिरोली -गोंदियाचा नक्षलग्रस्त भागही अस्वस्थ आहे. विशेष उल्लेखनीय म्हणजे, छत्तीसगड मध्ये घातपाती कृत्य केल्यानंतर तिकडचे नक्षलवादी गडचिरोली गोंदियाच्या जंगलाकडे (रेस्ट झोन मध्ये) धाव घेतात. ते लक्षात घेता गृहमंत्र्यांच्या दाैऱ्याने संपूर्ण राज्याची सुरक्षा यंत्रणा हायअलर्ट मोडवर आली आहे. खबरदारीसाठी आजपासूनच कडक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

Web Title: The scope of Home Minister Fadnavis in the cave of Naxalites

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.