रेल्वेची लेटलतिफी सुरूच; प्रवाशांचे मोठे हाल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2023 11:04 PM2023-06-05T23:04:27+5:302023-06-05T23:04:46+5:30
विविध भागातून आणि खासकरून दक्षिणेकडून येणाऱ्या रेल्वेगाड्या विलंबाने नागपुरात पोहचत आहेत.
नागपूर : गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू झालेली रेल्वेगाड्या उशिरा येण्याची मालिका आजही तशीच होती. आजही लांबपल्ल्याच्या आठ गाड्या विलंबाने नागपूर स्थानकावर पोहचल्या. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंंड हाल सुरू आहे. आज आझाद हिंद एक्सप्रेस तब्बल साडेआठ तास विलंबाने नागपुरात पोहचली, हे विशेष !
विविध भागातून आणि खासकरून दक्षिणेकडून येणाऱ्या रेल्वेगाड्या विलंबाने नागपुरात पोहचत आहेत. दोन आठवड्यांपासून प्रवाशांचा अंत पाहणारा हा प्रकार सुरू असून वारंवार तक्रारी, ओरड करूनही रेल्वे प्रशासनावर त्याचा परिणाम झालेला नाही. नेहमीप्रमाणे १२१२९ पुणे -हावडा आझाद हिंद एक्सप्रेस तब्बल ८.३० तास नागपूर स्थानकावर पोहचली. तर १९०३० शालिमार एलटीटी एक्सप्रेस पाच तास विलंबाने आली. गाडी क्रमांक १२२९५ संघमित्रा एक्सप्रेस ४.२० तास विलंबाने नागपुरात आली तर १२९५० ३.४० तास उशिरा नागपुरात पोहचली. १२८१६ हावडा सीएसएमटी साडेतीन तास विलंबाने तर १२१३० हावडा पुणे तीन तास विलंबाने नागपुरात आली. १२८६० गीतांजली एक्सप्रेसचे आगमन सव्वादोन तास विलंबाने झाले.
कर्मभूमी एक्सप्रेस रद्द
गाडी नंबर २२५१२ मुंबई एलटीटी कर्मभूमी एक्सप्रेस रद्द करण्यात आली. ती का रद्द करण्यात आली, त्याचे कारण अधिकाऱ्यांकडून स्पष्ट होऊ शकले नाही.
राजधानीचा खोळंबा
बिलासपूर नवी दिल्ली राजधानी एक्सप्रेस कामठी ते कळमना दरम्यान तासभर रेंगाळली. त्यामुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. विशेष म्हणजे, रेल्वेगाड्यांचा विलंब, खोळंबा, ऐनवेळी रद्द करण्याच्या प्रकारावर रेल्वे प्रशासन दिलगिरी व्यक्त करून मोकळे होत असले तरी ठोस कारण काय, ते सांगू पाहत नाही.