नोकरानेच केला विश्वासघात, साथीदारांच्या मदतीने पळविली तिजोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2023 07:51 PM2023-03-02T19:51:42+5:302023-03-02T19:52:09+5:30
Nagpur News चोरट्यांनी एका डिस्ट्रीब्युटरच्या कार्यालयातून नोटांनी भरलेली तिजोरी घेऊन पळ काढल्याच्या प्रकरणाचा अखेर उलगडा झाला आहे.
योगेश पांडे
नागपूर : चोरट्यांनी एका डिस्ट्रीब्युटरच्या कार्यालयातून नोटांनी भरलेली तिजोरी घेऊन पळ काढल्याच्या प्रकरणाचा अखेर उलगडा झाला आहे. संबंधित कार्यालयातील नोकरच या चोरीमागील सूत्रधार असून कर्जबाजारीपणातून सुटका करून घेण्यासाठी त्याने सहकाऱ्यांच्या मदतीने १०.३८ लाख रुपयांची ही चोरी केली. गुन्हे शाखेने नोकरासह तीन आरोपींना अटक केली आहे. विवेक उर्फ सोनू भाऊराव इंगळे (२२, रामेश्वरी), ऋतिक अविनाश सोनावणे (२२, नवाबपुरा, महाल), रणजीत राठोड (३०, ज्ञानेश्वर नगर, मानेवाडा) व सुलेश उर्फ गुड्डू बिसनलाल मस्करे (२२, खरसोली) अशी आरोपींची नावे आहेत. तर रोहीत चव्हाण (रमणा मारोती) हा पाचवा साथीदार फरार आहे.
प्रकाश रामदास कोहळे (४७) यांचे नेहरूनगर येथील ईटनकर भवनात पी. आर. ट्रेडर्स हे कार्यालय आहे. २५ फेब्रुवारी रोजी त्यांच्या कार्यालयात काम करणारे राहुल मांगलकर यांनी सायंकाळी साडेसात वाजता कुलूप लावले. त्यानंतर अज्ञात चोरट्यांनी कार्यालयाच्या मुख्य दाराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी लोखंडी चॅनेल गेटदेखील तोडले व लाकडी आलमारीचे कुलूप तोडण्यातदेखील ते यशस्वी झाले. मात्र, आलमारीमध्ये लोखंडाची तिजोरी होती व ती काही केल्या उघडत नव्हती. त्यात १०.३८ लाख रुपये रोख होती. अखेर चोरट्यांनी ती तिजोरीच घेऊन पळ काढला. हा प्रकार उघडकीस आल्यावर कोहळे यांनी सक्करदरा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली होती.
नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेकडूनदेखील याचा तपास सुरू होता. सीसीटीव्हीत तीन आरोपी दिसून आले. पोलिसांना कार्यालयातील व्यक्तीवर संशय होता. सोनू सहा ते सात वर्षांपासून कोहळेंकडे काम करत होता. पोलिसांनी त्यालादेखील विचारणा केली. मात्र तो विश्वासार्ह असल्याचे कोहळेंनी सांगितल्यावर पोलिसांनी कठोर विचारणा केली नाही. परंतु इलेक्ट्रॉनिक सर्व्हेलन्सच्या माध्यमातून या प्रकरणात सोनूचा सहभाग असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट चारला मिळाली. त्याआधारे गुन्हे शाखेने सोनूला ताब्यात घेतले. त्याने साथीदारांच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी चारही आरोपींना अटक करून त्यांच्याकडून रोख ४.६० लाख तसेच तीन दुचाकी, चार मोबाईल फोन जप्त केले.
पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भेदोडकर, निरंजना उमाळे, रविंद्र पानबुडे, मदनलाल मेश्राम, सुनिल ठवकर, निलेश ढोणे, सतिश ठाकरे, आशीष क्षीरसागर, संदीप मावलकर, महेश काटवले, लिलाधर भंडारकर, सत्येंद्र यादव, बलराम झाडोकर, पराग ढोक, मिथुन नाईक, शेखर राघोर्ते, अनंता क्षीरसागर यांच्या पथकाने ही कारवाई केली.
कर्ज फेडण्यासाठी केला चोरीचा ‘प्लॅन’
सोनू हा वसुलीची कामे करायचा व कार्यालयात मोठया प्रमाणात रोकड असते हे त्याला माहीती होते. त्याच्याकडे कार्यालयाची चाबीदेखील होती. घटनेच्या दोन आठवड्यांअगोदर सोनूला त्याचा मित्र रणजीत भेटला. रणजीतवरदेखील कर्ज होते. तेव्हा सोनूने कार्यालयात दररोज रोख पैसे असतात अशी माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी कार्यालयातून रक्कम चोरण्याचा ‘प्लॅन’ बनविला. सोनूनेच त्यांना चाबी उपलब्ध करून दिली होती. चोरी केल्यानंतर सुलेश याने त्याच्या दुचाकीवर दोन्ही आरोपींना आऊटर रिंगरोडला सोडले होते. त्यानंतर सुलेशने त्याच्या घरून कुदळ आणून तिजोरी फोडली होती.