कुटुंब नियोजनातील 'ती' किट; सांगता न येणारे दुखणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2022 07:30 AM2022-03-27T07:30:00+5:302022-03-27T07:30:01+5:30

Nagpur News कुटुंब नियोजन कार्यक्रमांतर्गत राज्याच्या आरोग्य विभागाने आशा वर्करला जनजागृती करण्यासाठी एक किट दिली आहे. या किटमध्ये रबरी लिंग देऊन आशा वर्कर यांना चांगलेच पेचात पाडले आहे.

The 'she' kit in family planning; Unexplained pain | कुटुंब नियोजनातील 'ती' किट; सांगता न येणारे दुखणे

कुटुंब नियोजनातील 'ती' किट; सांगता न येणारे दुखणे

googlenewsNext
ठळक मुद्देवर्करची होतेय कुचंबणा सरकारविरुद्ध आशांचा भडका

मंगेश व्यवहारे

नागपूर : कुटुंब नियोजन कार्यक्रमांतर्गत राज्याच्या आरोग्य विभागाने आशा वर्करला जनजागृती करण्यासाठी एक किट दिली आहे. या किटमध्ये रबरी लिंग देऊन आशा वर्कर यांना चांगलेच पेचात पाडले आहे. प्रात्यक्षिक दाखविण्यासाठी ही किट घेऊन ग्रामीण भागातील महिलांसमोर जायचं कसे, या विवंचनेत आशा वर्कर सापडल्या आहेत. ही किट एकप्रकारे आशा वर्करची कुचंबणा करणारी आहे. या किटमुळे आशांची अब्रू धोक्यात येणार असल्याचा संताप आशा वर्करमधून व्यक्त होत आहे.

- कुटुंब नियोजन प्रसाराच्या मूळ उद्देशालाच लागू शकते ग्रहण

गावोगावीच्या आशा वर्कर्सना दिल्या गेलेल्या या किटमुळे आशा वर्कर्समध्ये असंतोष पसरला आहे. यासंदर्भात काही आशा वर्करशी केलेल्या चर्चेत त्यांनी सांगितले की, अनेक वर्षांपासून आम्ही कुटुंब नियोजनाचे महत्त्व व नियंत्रणाच्या पद्धती ग्रामीण महिलांना समजावून सांगतच होतो. तोंडी सांगताना आम्हाला व त्या महिलांनाही ऐकताना कुठलाच संकोच वाटत नव्हता. अगदी प्रथमच ऐकणारी महिला असेल तर तिला सुरुवातीला थोडाफार संकोच व्हायचा. कालांतराने तो निघून जायचा. ती नि:संकोचपणे आपले प्रश्न विचारत होती. आता रबरी लिंगाचे प्रात्यक्षिक करून दाखवीत महिलांना ही माहिती देणे व महिलांनाही ती ऐकणे, या दोन्ही गोष्टी अवघड झाल्या आहेत. त्यामुळे शासनाच्या जनजागृतीच्या उद्देशाला ग्रहण लागू शकते.

- या किटची गरजच नव्हती

बहुतांश महिलांना स्त्री-पुरुष संबंधांची माहिती असते. त्यामुळे त्यांना तोंडी सांगितले तरी पटकन समजते. पण या किटद्वारे प्रात्यक्षिक देणे म्हणजे आशा वर्करची बदनामी करण्यासारखा प्रकार आहे. या किटच्या आधारे प्रात्यक्षिक केले तर गावात तिला प्रतिसादच मिळणार नाही. उलट गावात बदनामी होऊ शकते. सोशल मीडिया, फेसबुक, व्हॉट्सॲप व वृत्तपत्रांमधूनही कुटुंब नियोजनाबाबतची माहिती दिली जाते. मग या किटची गरज काय?

प्रीती मेश्राम, महासचिव, आशा संघटना

आशा वर्कर्सचा कडाडून विरोध

- आशा वर्कर्स ही किट घेऊन घरोघरी फिरणार आहे. त्यामुळे टवाळखोर लोकांचा त्रास तिला होणार आहे. टवाळखोर आशा वर्कर्सच्या घरापर्यंत येऊ शकतात, रस्त्यात थांबवू शकतात. त्यांची छेड काढू शकतात. तिच्या अब्रूला धोका होऊ शकतो. ज्या उच्चपदस्थ अधिकारी वर्गाने वस्तुस्थितीची जाणीव न ठेवता अशा प्रकारची कृती केली आहे, त्याचा आशा व गट प्रवर्तक कर्मचारी युनियन (सीटू) निषेध करते. महिलांच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचविण्याची कृती प्रशासनाकडून करण्यात आली आहे. यासंदर्भात राज्य महिला आयोगाला तक्रार केली आहे. कोणत्याही परिस्थितीत आशांच्या सुरक्षेला धक्का लागू देणार नाही.

- राजेंद्र साठे, जिल्हाध्यक्ष, आशा व गट प्रवर्तक कर्मचारी युनियन (सीटू)

Web Title: The 'she' kit in family planning; Unexplained pain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.