शिंदे-फडणवीस सरकार 40 दिवस अजगरासारखे सुस्त पडले होते; विजय वडेट्टीवारांचे आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2023 09:46 AM2023-10-31T09:46:53+5:302023-10-31T09:47:27+5:30
सरकारने विशेष अधिवेशन बोलवावे. आजच्या मंत्रिमंडळात हा ठोस निर्णय घेतात का याकडे आमचे लक्ष लागले आहे. - विजय वडेट्टीवार
मराठा आरक्षणावरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. शिंदे-फडणवीस सरकार 40 दिवस अजगरासारखे सुस्त पडले होते. आज मंत्रिमंडळामध्ये काही ठोस निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे. जरांगे पाटलांची प्रकृती खालावली असल्यामुळे मराठा समाजाच्या मागण्यांसाठी आरक्षणासाठी बैठकीत काय निर्णय घेते याकडे आमचे लक्ष लागलेले आहे, असे वडेट्टीवार म्हणाले.
कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. शासकीय मालमत्तेचे नुकसान होत आहे. हे आंदोलन संपून न्याय देण्याची मागणी काँग्रेसच्यावतीने राज्यपालांना भेटून केली आहे, असे वडेट्टीवार म्हणाले. तसेच सरकारला आवाहन करतोय. तुम्ही लावलेली ही आग आहे. सरकारच्या चुकीच्या घोषणेमुळे निर्णयामुळे, खोट्या आश्वासनांमुळे महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती गंभीर झालेली आहे. आमचा सरकारवर विश्वास नाही, जरांगे पाटलांनी सांगितले. राज्यात सरकारने विश्वास गमावला. सरकारने पायउतार झाले पाहिजे, हे सरकार असंविधानीक आहे. तिन्ही नेते एकमेकांवर ढकलले जात आहे. जबाबदारी तिन्ही पक्षाचे नेते एकत्र बसून निर्णय घेत नाही. तीन तोंडाचे तीन सरकार आहे, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.
सरकारने विशेष अधिवेशन बोलवावे. आजच्या मंत्रिमंडळात हा ठोस निर्णय घेतात का याकडे आमचे लक्ष लागले आहे. हे आंदोलन आणि मागण्या तातडीने सोडविल्या पाहिजेत. उग्रपणे आंदोलन सुरू आहे हे आंदोलन थांबले पाहिजे. मालमत्तेचे नुकसान करून जीव जाऊन काही उपयोग होणार नाही. शांततेने आंदोलन करा, तुमच्या मागणीला यश देण्याचे काम सरकार करेल, असा विश्वास आहे, असेही वडेट्टीवार म्हणाले.