बॉम्बच्या अफवेने सीताबर्डी पोलिसांना फोडला घाम
By दयानंद पाईकराव | Published: May 24, 2024 05:34 PM2024-05-24T17:34:15+5:302024-05-24T17:34:41+5:30
खोडसाळपणे केला फोन : अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
नागपूर : सीताबर्डीतील मोदी नं. २ आणि ३ मधील पुनम चॅट भांडार आणि अमृत प्लाझामध्ये बॉम्ब असल्याचा फोन अज्ञात आरोपीने नियंत्रण कक्षाला केल्यामुळे शुक्रवारी दुपारी एकच खळबळ उडाली. बॉम्ब शोधक व नाशक पथक व सीताबर्डी पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. परंतु तपासणी अंती काहीच आढळले नसल्यामुळे हा फोन खोडसाळपणे करण्यात आल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यामुळे सीताबर्डी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे.
शुक्रवारी दुपारी १२.०७ वाजता अज्ञात आरोपीने नियंत्रण कक्षाला ११२ क्रमांकावर फोन केला. आरोपीने सीताबर्डी ठाण्याच्या हद्दीत असलेल्या मोदी नं. २ आणि ३ मधील पुनम चॅट भांडार आणि अमृत प्लाझा येथे बॉम्ब ठेवण्यात आल्याची माहिती दिली. या फोनमुळे पोलिस विभागात प्रचंड खळबळ उडाली. घटनेची माहिती नियंत्रण कक्षाने सीताबर्डी पोलिसांना दिली. सीताबर्डी पोलिसांनी तातडीने बॉम्ब शोधक व नाशक पथकाला पाचारण केले.
सीताबर्डीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक आसाराम चोरमले आणि १२ पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. बॉम्ब शोधक व नाशक पथकाने पुनम चॅट भांडार आणि अमृत प्लाझाची कसून तपासणी केली. परंतु तपासणी अंती काहीच आढळले नाही. त्यामुळे बॉम्ब असल्याचा फोन खोडसाळपणे करण्यात आल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. या प्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध कलम ५०५ (२) व ५०६ (बी) नुसार गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे. दरम्यान ४ जून पूर्वी या परिसराची पुन्हा तपासणी करण्यात येईल, अशी माहिती सीताबर्डीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक आसाराम चोरमले यांनी दिली.