कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर आढळलेले ते सहा भ्रूण आले कुठून? पोलीस तपासात माहिती समोर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2022 10:21 AM2022-03-11T10:21:46+5:302022-03-11T10:43:30+5:30
Infant Found in Nagpur : बुधवारी दुपारी लकडगंजच्या गरोबा मैदान येथील देवडिया हॉस्पिटलजवळ कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सहा अर्भक तसेच बायोमेडिकल वेस्ट मिळाल्यामुळे खळबळ उडाली होती.
नागपूर : कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आढळलेले सहा अर्भक लकडगंजच्या एका खासगी नर्सिंग होममधून आणून फेकण्यात आल्याचा खुलासा पोलिसांच्या तपासात झाला आहे. पोलिसांनी नर्सिंग होमचे डॉक्टर, भंगार व्यावसायिक तसेच कचरा उचलणाऱ्या व्यक्तींसह अनेक नागरिकांची चौकशी केली आहे. तपासात डॉक्टरांनी हे अर्भक सहा वर्षे जुने असल्याचे सांगितले आहे.
पोलीस शवविच्छेदन तसेच न्यायवैद्यक तपासातून अर्भकाबाबत खरी माहिती गोळा करीत आहेत. बुधवारी दुपारी लकडगंजच्या गरोबा मैदान येथील देवडिया हॉस्पिटलजवळ कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सहा अर्भक तसेच बायोमेडिकल वेस्ट मिळाल्यामुळे खळबळ उडाली होती. या प्रकरणी पोलिसांनी सीसीटीव्हीद्वारे अर्भक फेकणाऱ्या भंगारवाल्याचा शोध घेतला. त्याची चौकशी केल्यानंतर क्वेटा कॉलनीतील पुरोहित नर्सिंग होमचे संचालक डॉ. गोकुल पुरोहित, केअर टेकर बिपीन साहू, भंगारवाला सुनील साहूची चौकशी केली.
चौकशीत डॉ. पुरोहितची पत्नी डॉ. यशोदा पुरोहित स्त्रीरोगतज्ज्ञ होत्या. त्या नंदनवनच्या एका होमिओपॅथी कॉलेजशी निगडित होत्या. तेथे विद्यार्थी आणि इन्टर्न विद्यार्थ्यांना काही अडचण असल्यास रुग्णालयात मार्गदर्शन करीत होत्या. डॉ. यशोधा यांनी शिकविण्यासाठी सहा अर्भक आणले होते. त्याद्वारे त्या प्रशिक्षण देत होत्या. त्यांनी हॉस्पिटलमध्ये अर्भक सुरक्षित ठेवले होते. २०१६ मध्ये यशोदा यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्या वापरत असलेले साहित्य तसेच ठेवलेले होते.
काही दिवसांपूर्वी हॉस्पिटलच्या पुनर्निर्मितीस सुरुवात झाली. त्यामुळे डॉ. गोकुल पुरोहित यांनी केअर टेकर बिपीन साहू यांना पडलेले सामान भंगार व्यावसायिक सुनील साहूला विकण्यास सांगितले. बिपीनने सुनीलला हॉस्पिटलमध्ये बोलावून भंगार विकले. सुनीलने भंगारासह बायोमेडिकल वेस्ट आणि अर्भकही घेतले. हे सामान कोणत्याच कामाचे नसल्यामुळे सुनीलने बंद पडलेल्या महापालिकेच्या देवडिया हॉस्पिटल जवळील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकले. त्यावर कचरा उचलणाऱ्या व्यक्तीचे लक्ष गेले. त्याने काचाच्या बरणीत ठेवलेले अर्भक आणि बायोमेडिकल वेस्ट फेकून काचेची बरणी घेऊन निघून गेला. त्यानंतर दोन युवकांची नजर त्याकडे गेल्यामुळे खळबळ उडाली होती. पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेऊन तपास सुरू केला आहे.
अर्भकाबाबत माहिती घेत आहोत : पोलीस आयुक्त
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले की, आम्ही हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. सर्वात आधी शवविच्छेदन आणि न्यायवैद्यक अहवालावरून अर्भक किती जुने आहे याचा शोध घेण्यात येत आहे. अर्भक ठेवण्याची किंवा त्या आधारे विद्यार्थ्याना प्रशिक्षण देण्याची नर्सिंग होमकडे परवानगी आहे काय याचाही तपास करण्यात येत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नर्सिंग होमची पाहणी केली आहे. कागदपत्र तपासण्यात येत आहेत. महापालिकेलाही तपासासाठी पत्र देण्यात आले आहे. बायोमेडिकल वेस्ट अशा पद्धतीने फेकणे गुन्हा आहे. परंतु पोलिसांसमोर अर्भकाबाबत खरी माहिती गोळा करणे हा मोठा प्रश्न आहे. ज्या होमिओपॅथीच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले त्यांनाही चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.
...........