जलप्रलयाला कारणीभूत ठरलेला नाग नदीवरील 'तो' स्लॅब कोसळणार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2023 10:51 AM2023-09-27T10:51:32+5:302023-09-27T10:54:02+5:30
मनपा आयुक्तांकडून दुजोरा : लोकमतच्या बातमीनंतर डागा लेआऊट, कार्पोरेशन कॉलनीतील लोकांनीही केल्या तक्रारी
नागपूर : नागनदीच्या पुरामुळे डागा लेआऊट, कार्पोरेशन कॉलनी, गांधीनगर या भागाचे सर्वाधिक नुकसानीला एनआयटीचा स्केटींग मैदान कारणीभूत ठरले होते. लोकमतने यांसदर्भात शुक्रवारी वृत्त प्रकाशित करून प्रशासनापुढे परिस्थिती मांडली होती. येथे एनआयटीने स्केटींग रिंगसाठी नागनदीवर स्लॅब टाकून पाणी अडविले होते. हे स्लॅब तुटणार असल्याचा दुजोरा महापालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी दिला.
नागनदीला आलेल्या पुराने अंबाझरीच्या पायथ्याशी असलेले डागा ले-आउट, काॅर्पोरेशन कॉलनी, गांधीनगर या भागाचे सर्वाधिक नुकसान केले होते. या वस्त्यांना उद्ध्वस्त करण्यामागे नागनदीच्या प्रवाहाला डागा ले-आउट येथे एनआयटी स्केटिंग रिंगजवळ अडविण्यात आल्यानेच लोकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, असा दावा लोकमतच्या पथकाने नागनदीची पाहणी करून केला होता. डागा ले-आउटमधून जाणाऱ्या नागनदीवर स्केटिंग रिंग बनविण्यात आली आहे. या स्केटिंग रिंगसाठी नागनदीवर स्लॅब टाकण्यात आल्यामुळे नदीच्या प्रवाहाला अडथळा आला आहे.
शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाला. नागनदीला प्रचंड पूर आला. पुराच्या पाण्याला प्रचंड प्रवाह होता; पण स्केटिंग रिंगजवळ त्या प्रवाहाचा मार्गच थांबविल्याने पाण्याच्या प्रवाहाने स्लॅपवरील सुरक्षा भिंतच तोडली, स्केटिंग रिंगजवळ असलेल्या दोन माळ्याच्या इमारतीवरून पाणी प्रचंड वेगाने डागा ले-आउटमध्ये शिरले. पुराचे पाणी डागा ले-आउट, काॅर्पोपेशन कॉलनी, गांधीनगर वस्त्यांमध्ये शिरल्याने प्रत्येक घराचे नुकसान केले. यासंदर्भात मनपा आयुक्तांचे लक्ष वेधले असता, त्यांनी नागनदीवरील स्लॅब तोडण्यात येणार असल्याचे सांगितले. विशेष म्हणजे, लोकमतचे वृत्त प्रकाशित झाल्यानंतर परिसरातील लोकांनीही त्यासंदर्भात एनआयटी प्रशासनाकडे तक्रारी केल्याची माहिती आहे.