गडकरींना धमकी देणारा आरोपी महिला आयपीएस अधिकाऱ्याचा तथाकथित ‘खबरी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2023 10:30 PM2023-01-17T22:30:32+5:302023-01-17T22:31:01+5:30
Nagpur News केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयात फोन करून धमकी देणारा जयेश कांता हा कर्नाटकातील एका महिला आयपीएस अधिकाऱ्याशी पोलिसांचा खबरी म्हणून बोलणे करायचा.
नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयात फोन करून धमकी देणारा जयेश कांता हा कर्नाटकातील एका महिला आयपीएस अधिकाऱ्याशी पोलिसांचा खबरी म्हणून बोलणे करायचा. संबंधित महिला अधिकाऱ्याशी तो बोलत असे. त्यांनी या महिला आयपीएसशी अर्धा तासाहून अधिक बोलणे केले आहे. जयेशच्या मोबाइलच्या तपासात ही बाब समोर आली आहे. गडकरींच्या कार्यालयात फोन केल्याबाबत मात्र तो नकार देत आहे.
बेळगाव (कर्नाटक) येथील गुन्हेगार जयेश ऊर्फ जपेश कांता एस. ऊर्फ शाकीर ऊर्फ साहिर याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याने १४ जानेवारी रोजी गडकरींच्या कार्यालयात फोन केला. बेळगाव कारागृहातून जयेशचा फोन आल्याची खात्री होताच शहर पोलिसांचे पथक तेथे रवाना झाले. गडकरींच्या कार्यालयात फोन केल्याचा आरोप जयेश फेटाळत आहे. पोलिसांना पाहताच ‘मोबाइल दाखवा, संभाषणाची क्लिप दाखवा, मग माझी चौकशी करा’ असे तो म्हणत आहे. गुन्ह्यात वापरलेला मोबाइल किंवा सीमकार्ड न मिळाल्याने पोलिसांनीदेखील ठोस कारवाई केलेली नाही.
गडकरींच्या कार्यालयात फोन करण्यापूर्वी आणि नंतर जयेश त्याच्या ओळखीच्या काही लोकांशी बोलला. जयेश बराच काळापासून मोबाइल वापरत होता. तो खबरी असल्याची बतावणी करत कर्नाटकमधील एका महिला आयपीएस अधिकाऱ्याशीदेखील बोलायचा. सीडीआरच्या तपासात जयेश या महिला आयपीएसशी दोन हजार सेकंद बोलल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या महिला आयपीएसला जयेशबाबतचे सत्य माहीत नसल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. जयेशकडून एक डायरी मिळाली आहे. त्यात गडकरींच्या जुन्या मोबाइल क्रमांकासह अनेकांची नावे आहेत. त्यातील बहुतांश लोक कर्नाटकातील आहेत.