महाराष्ट्राच्या सुपुत्राने ‘ऑपरेशन बालासोर’ राबवून वाचविले शेकडो जणांचे प्राण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2023 09:34 PM2023-06-08T21:34:26+5:302023-06-08T21:36:15+5:30

Nagpur News बालासोर येथील रेल्वेच्या भीषण अपघातानंतर तातडीने निर्णय घेऊन पावले उचलीत अनेकांचे प्राण वाचविणारे जिल्हाधिकारी दत्तात्रेय उर्फ दत्ता शिंदे हे मूळचे महाराष्ट्रातील पारनेर तालुक्याचे रहिवासी आहेत. त्यांनी राबविलेल्या 'ऑपरेशन बालासोर' चे सर्व पातळ्यांवरून कौतुक केले जात आहे.

The son of Maharashtra saved hundreds of lives by implementing 'Operation Balasore'! | महाराष्ट्राच्या सुपुत्राने ‘ऑपरेशन बालासोर’ राबवून वाचविले शेकडो जणांचे प्राण!

महाराष्ट्राच्या सुपुत्राने ‘ऑपरेशन बालासोर’ राबवून वाचविले शेकडो जणांचे प्राण!

googlenewsNext

 
नरेश डोंगरे
नागपूर : एकीकडे मृतदेहांचा खच, त्यात मध्ये-मध्येे दबलेले वेदनांनी विव्हळणारे गंभीर जखमी. मृतांच्या नातेवाइकांच्या किंकाळ्या, आक्रोश अन् वेदनांचा तो क्षण कुणाच्याही काळजाचे पाणी करणारा होता. मीसुद्धा त्या क्षणी सुन्न झालो होतो. मात्र कर्तव्य भावनेने दुसऱ्याच क्षणी भानावर आणले. त्यानंतर ॲम्बुलन्स, अग्निशमन दलाचे बंब, डॉक्टर, नर्सेस, कर्मचारी, पोलिस आणि त्यांच्याच तत्परतेने शेकडो देवदूत घटनास्थळी पोहोचले अन् सुरू झाले 'ऑपरेशन बालासोर'. जखमींवर तातडीने उपचार करण्याला प्राधान्य देण्याचा पहिला निर्णय घेतला. त्यानुसार, काहींवर घटनास्थळीच तर इतरांवर तातडीने रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले. त्यामुळे अनेकांचे प्राण वाचविण्यात यश मिळाले. ही प्रतिक्रिया वजा भावना आहे महाराष्ट्राच्या त्या सुपुत्राची, ज्याने देश-विदेशात चर्चेला आलेल्या बालासोर (ओडिशा) येथील रेल्वेच्या भीषण अपघातानंतरची संपूर्ण परिस्थिती हाताळली. शेकडो जखमींना तातडीने मदत उपलब्ध करून देत त्यांचे प्राण वाचविले. त्यांचे नाव आहे, दत्तात्रेय भाऊसाहेब शिंदे!

महाराष्ट्राच्या पारनेर तालुक्यातील मूळ निवासी असलेले दत्तात्रेय ऊर्फ दत्ता शिंदे बालासोरमध्ये जिल्हाधिकारी म्हणून सेवारत आहेत. २ जूनच्या रात्री बालासोरमध्ये भीषण अपघात झाला अन् त्यात तीनशेच्या आसपास व्यक्तींचे जीव गेले. शेकडो जणांना गंभीर दुखापत झाली. अपघातस्थळी पोहोचताच जिल्हाधिकारी शिंदे यांनी जलदगतीने निर्णय घेतले, भरीव मदतकार्यही राबविले. ‘लोकमत’ प्रतिनिधीने आज त्यांच्याशी संपर्क साधून ‘ऑपरेशन बालासोर’ जाणून घेण्याचा प्रयत्न केला. अत्याधिक व्यस्त असूनही सहकाऱ्यांना आवश्यक निर्देश देता-देताच त्यांनी ‘लोकमत’ला माहितीही दिली. ते म्हणाले, तेथे त्यावेळी खूप अंधार होता. त्यामुळे ५० टॉवर लाइट्सची व्यवस्था करून जखमींना रुग्णालयात हलविणे सुरू केले. सुमारे एक हजार ते बाराशे व्यक्तींना आजूबाजूच्या शहरातील विविध इस्पितळात पाठविले. ठिकठिकाणच्या ॲम्बुलन्स बोलावून काही जखमींवर जागीच उपचार सुरू केले.

आम्ही अडीच हजार अन् शेकडो देवदूत
‘लोकमत’शी बोलताना शिंदे यांनी देवदूतांची गोष्ट सांगितली. गेल्या सहा दिवसांपासून आम्ही सुमारे अडीच हजार अधिकारी-कर्मचारी काम करीत आहोत. मात्र, अपघात झाल्यापासूनच शेकडो देवदूत येथे अपघातग्रस्तांंच्या मदतीसाठी तहान-भूक विसरून अहोरात्र मदतकार्य करीत आहोत. एक आवाहन केले आणि शेकडो नागरिक रक्तदानासाठी हजर झाले. शेकडो हात जखमींना ॲम्ब्युलन्समध्ये आणि मृतदेह रुग्णालयात पोहोचविण्यास सरसावले. कोणतीही अपेक्षा न करता स्वयंस्फूर्तीने या देवदूतांनी मदत कार्यात दिलेले योगदान अतुलनीय असल्याचेही ते म्हणाले.

आता ‘त्यांना’ सर्वोच्च प्राधान्य
आता कशाला प्राधान्य देताहात, असे विचारले असता शिंदे म्हणाले, जखमींवर तातडीचे उपचार ही आतापर्यंतची प्रायोरिटी होती. आता मात्र अपघातातील मृतांच्या नातेवाइकांना घरपोच डेथ सर्टिफिकेट आणि सरकारी मदत देण्याला प्राधान्य देत आहोत. प्रमाणपत्राशिवाय विम्याची रक्कम आणि अन्य सुविधा मिळत नाहीत. त्यामुळे वेेगवेगळ्या पथकांना डेथ सर्टिफिकेट आणि सरकारी मदत मिळवून देण्यासाठी नियुक्त करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
-----

Web Title: The son of Maharashtra saved hundreds of lives by implementing 'Operation Balasore'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.