तुमच्या वाहनातील वेग नियंत्रकाचाही आता द्यावा लागणार अहवाल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2023 08:00 AM2023-06-06T08:00:00+5:302023-06-06T08:00:02+5:30

Nagpur News वाहनाचा वेग नियंत्रित ठेवण्यासाठी वेग नियंत्रक लावले जाते. मात्र त्याचाही चाचणी अहवाल सादर करणे आता अनिवार्य केले आहे.

The speed controller in your vehicle will also now have to be reported | तुमच्या वाहनातील वेग नियंत्रकाचाही आता द्यावा लागणार अहवाल 

तुमच्या वाहनातील वेग नियंत्रकाचाही आता द्यावा लागणार अहवाल 

googlenewsNext

 

सुमेध वाघमारे

नागपूर : वाहन चालविताना गतीची मर्यादा पाळली जात नसल्याने होणाऱ्या अपघातांमध्ये अनेकांचे नाहक बळी जात आहेत. रस्ते अपघाताला रोखण्यासाठी वाहनामध्ये वेग नियंत्रक (स्पीड गव्हर्नर) बसविणे बंधनकारक आहे. मात्र, या यंत्रात छेडछाड होण्याचे प्रमाण वाढले आहे. याची दखल घेत परिवहन विभागाने वाहनाचे फिटनेस सर्टिफिकेट देताना वेग नियंत्रक चाचणीचा अहवाल देण्याचे निर्देश सर्व आरटीओ कार्यालयांना दिले आहे.

महामार्गासोबतच सामान्य रस्त्यावर भरधाव वेगाने वाहन चालविण्याचे प्रमाण वाढले आहे. एकट्या समृद्धी महामार्गावर नोव्हेंबर, २०२२ ते एप्रिल, २०२३, या सहा महिन्यांत ८०१ अपघात झाले. यात ४५ जणांचा मृत्यू, ५०७ गंभीर जखमी, २४१ किरकोळ जखमी झालेत. ही संख्या फार मोठी आहे. वाढत्या रस्ता अपघातामागे भरधाव वेग हे मुख्य कारण आहे. याची दखल घेत, २०१६ मध्ये नव्यासह जुन्या वाहनांना वेग नियंत्रक बसविणे बंधनकारक करण्यात आले, परंतु सात वर्षांचा काळ लोटूनही वेग नियंत्रकाची अंमलबजावणी काटेकोरपणे होत नसल्याचे चित्र आहे. ‘आरटीओ’मध्ये होत असलेल्या वाहन तपासणीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ५ जून रोजी परिवहन विभागाने काढलेल्या पत्रातही वेग नियंत्रकाची पडताळणी काटेकोर पद्धतीने होत नसल्याचे म्हटले आहे.

- सील क्रमांकाची होणार खातरजमा

वाहनामधील वेग नियंत्रकाच्या ‘युनिक आयडेन्टिटी’सोबत ‘सील क्रमांका’चा केलेल्या जोडणीची पोर्टलवर नोंद घेतली जाते. आरटीओच्या तपासणी अधिकाऱ्याने फिटनेसच्या नूतनीकरणासाठी येणाऱ्या वाहनांची तपासणी करताना सील क्रमांकाची खातरजमा करण्याचा सूचना या पत्रातून दिल्या आहेत.

-चुकीचे वेग नियंत्रक बसविणाऱ्यावर कारवाई

तपासणीच्या दरम्यान वाहनामध्ये चुकीचे उपकरण बसविल्याचे निर्देशनास आल्यास, अशा केंद्रावर नोंदणी प्राधिकारी यांनी त्यांच्या स्तरावर कारवाई करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

- वेगमर्यादेची प्रत्यक्ष तपासणी

निरीक्षक किंवा सहायक मोटार वाहन निरीक्षक यांनी प्रत्यक्ष वाहनांची वेग मर्यादेची तपासणी करावी, याशिवाय उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किंवा सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी यातील किमान २० टक्के वाहनांची फेर तपासणी करण्याच्याही सूचना आहेत.

- प्रवासी बसेसची १०० टक्के फेरतपासणी

प्रवासी बसेसमध्ये होणारे अपघात लक्षात घेऊन फिटनेस सर्टिफिकेटचे नूतनीकरण केल्यानंतर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किंवा सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी पुन्हा म्हणजे १०० टक्के फेरतपासणी करण्याचे व त्याचा अहवाल दरमहा परिवहन आयुक्त कार्यालयात सादर करण्याचेही निर्देश आहेत.

- वेग नियंत्रकाची काटेकोरपणे अंमलबजावणी

वाहनांच्या वेगावर नियंत्रण आणून अपघात कमी करण्यासाठी वेग नियंत्रकाची काटेकोरपणे अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. यासाठी सर्व आरटीओ कार्यालयांना या तपासणीचा दरमहा अहवाल मागितला आहे. यामुळे यातील त्रुटी दूर होतील.

-विवेक भिमनवार, परिवहन आयुक्त.

Web Title: The speed controller in your vehicle will also now have to be reported

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.