नागपुरात ट्रॅव्हल्सचा वेग ठरतोय घातक, २४ तासांत दोघांचा मृत्यू
By योगेश पांडे | Published: October 4, 2023 04:35 PM2023-10-04T16:35:15+5:302023-10-04T16:37:43+5:30
वाहतूक विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह
नागपूर : वाहतूक पोलिसांच्या डोळ्यासमोर खाजगी ट्रॅव्हल्च्या बसेस नियमांचे उल्लंघन करत जाताना दिसून येतात. कारवाईचे प्रमाण नगण्य असल्यामुळे चालक आणखी शेफारतात व त्यातूनच अपघात होतात. २४ तासांत दोन बेदरकार ट्रॅव्हल्सच्या धडकेत दोन नागरिकांना प्राण गमवावे लागले. वाडी व सक्कदरदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हे अपघात झाले असून वाहतूक विभागाच्या कार्यप्रणालीवर यातून प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
मंगळवारी सायंकाळच्या सुमारास वाडी येथे अमरावती मार्गावरील भारत पेट्रोल पंपसमोर जितेंद्र रघुनाथ ठवरे (५३, मोठा इंदोरा, जरीपटका) हे पायी रस्ता ओलांडत होते. त्याचवेळी एमएच ४० वाय ८२०० या क्रमांकाची बस वेगात आली. बसचालक शेख महमूद शेख वाहब (५५, कामगार कॉलनी, कपिलनगर) याचे बसवरील नियंत्रण सुटले व भरधाव बसने जितेंद्र यांना धडक दिली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. बसचालकाने बस थांबविण्याचेदेखील सौजन्य दाखविले नाही व तो बससह पसार झाला. या अपघातानंतर काही काळ घटनास्थळावर तणाव निर्माण झाला होता. वाडी पोलीस ठाण्यातील पथक तेथे पोहोचले. पोलिसांनी ट्रॅव्हल्सचालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध घेण्यात येत आहे.
दुसरा अपघात सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाला. मोठा ताजबाग परिसरातील न्यू सराय समोरील फुटपाथच्या बाजुला बसलेला एका युवकावर एपी २९ बीबी ४४३७ या क्रमांकाची ट्रॅव्हल्स वेगाने धडकली. बस त्याच्या अंगावरून गेल्याने अनोळखी व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. मोहम्मद जाकीर मोहम्मद युसूफ (४८, याकुबपुरा, हैदराबाद) हा ती बस चालवत होता. पोलिसांनी चालकाविरोधात गुन्हा नोंदविला आहे.