पर्यटनाच्या विकासासाठी राज्य सरकार प्रयत्नशील; गिरीश महाजन
By मोरेश्वर मानापुरे | Published: January 29, 2024 09:01 PM2024-01-29T21:01:53+5:302024-01-29T21:02:13+5:30
खासदार औद्योगिक महोत्सव
नागपूर : पर्यटनाला पुढे नेण्याची भाषणे करून होणार नाही. त्यासाठी तशी इकोसिस्टम तयार करत योग्य पावले उचलावी लागेल. त्याअनुषंगाने राज्य सरकार प्रयत्नशील असल्याची माहिती राज्याचे पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी सोमवारी दिली.
असोसिएशन फॉर इंडस्ट्रिअल डेव्हलपमेंटतर्फे (एड) आयोजित आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार होत असलेल्या खासदार औद्योगिक महोत्सव-अॅडव्हांटेज विदर्भच्या तिसºया दिवशी ‘टुरिझम अॅण्ड हॉस्पिटॅलिटी’ क्षेत्रावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पर्यटन मंत्री गिरीश महाजन बोलत होते. व्यासपीठावर हॉटेल अॅण्ड रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडियाचे अध्यक्ष प्रदीप शेट्टी, जसबीरसिंग अरोरा, संजय गुप्ता, अफजल मीठा, नागपूर रेसिडेन्शिअल हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष तेजिंदरसिंग रेणू उपस्थित होते.
पर्यटनाचे अर्थव्यवस्थेतील महत्त्व विषद करताना महाजन म्हणाले, आजघडीला गोवा, जम्मू आणि काश्मीर यांसारखी राज्ये केवळ पर्यटनाच्या आधारे आर्थिकदृष्ट्या प्रगती साधत आहेत. जगातील अनेक देशांची अर्थव्यवस्था ही पर्यटनावर अवलंबून आहे. त्या तुलनेत आपण बरेच मागे पडलोय. कधीकाळी महाराष्ट्र पर्यटनाच्या क्षेत्रात देशामध्ये दुसऱ्या क्रमांकावर होता. आता आपण नवव्या-दहाव्या क्रमांकावर आला आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी शाश्वत, पर्यावरणपूरक पर्यटन धोरण अत्यावश्यक आहे. त्यादृष्टीने येत्या महिनाभरात हे धोरण जाहीर करण्यासाठी प्रयत्न राहणार आहेत. विदर्भात ताडोबा, पेंच, नागझिरा यासारखे राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्प आहेत. हे प्रकल्प विदर्भाला पर्यटनाच्या क्षेत्रात अग्रेसर करणारी शक्तीस्थळे आहेत, असे महाजन म्हणाले.