राज्याला सक्षम महिला मुख्यमंत्री हवी, ‘कठपुतली’ नको; महिला नेत्यांचा सूर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2023 08:41 AM2023-03-26T08:41:46+5:302023-03-26T08:42:00+5:30
विदर्भस्तरीय लोकमत ज्योत्स्ना सखी सन्मान पुरस्कारांचे नागपुरात थाटात वितरण
नागपूर : पुरोगामी महाराष्ट्राला आजपर्यंत महिला मुख्यमंत्री लाभली नाही, हा चर्चेचा व चिंतेचा विषय नक्कीच आहे. मात्र, केवळ महिला मुख्यमंत्री झाली, म्हणजे महिलांचे सर्व प्रश्न सुटतील, असे नाही. जात व पितृसत्ताक व्यवस्थेतून बाहेर पडणाऱ्या महिला पुढे येणे आवश्यक आहे. हे मोठे राज्य स्वक्षमतेने सांभाळू शकेल, अशी सक्षम महिलाच मुख्यमंत्रिपदावर यायला हवी, कुणाच्या तरी इशाऱ्यांवर काम करणारी ‘कठपुतली’ नको, अशी परखड भूमिका प्रमुख महिला नेत्यांनी शनिवारी येथे ‘लोकमत’च्या मंचावर मांडली.
लोकमत वृत्तपत्र समूहातर्फे नागपुरात आयोजित विदर्भस्तरीय लोकमत ज्योत्स्ना सखी सन्मान पुरस्कारांचे वितरण ‘लोकमत’ वृत्तपत्रसमूहाच्या ‘एडिटोरिअल बोर्ड’चे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा यांच्या अध्यक्षतेखाली, तसेच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारे, नागपूर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सुनीता गावंडे, ‘जीएसटी’च्या सहआयुक्त निधी चौधरी व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील समाजशास्त्र विभागप्रमुख प्रा.श्रुती तांबे, प्रसिद्ध ज्वेलरी डिझायनर व ‘इन्ट्रिया’च्या संचालिका पूर्वा दर्डा-कोठारी यांच्या हस्ते थाटात पार पडले.
भारतीय जीवन बिमा निगम प्रायोजित या कार्यक्रमाला निर्मिक ग्रामीण विकास व बहुउद्देशीय संस्थेचे सहकार्य होते. समारंभाला जोडून ‘महिला मुख्यमंत्र्यांसाठी महाराष्ट्राला आणखी किती प्रतीक्षा?’ या विषयावरील परिचर्चेत राज्यातील चार प्रमुख पक्षांच्या ज्येष्ठ महिला नेत्यांनी मनमोकळेपणाने विचार मांडले. ‘बिमारू’ राज्य म्हणून गणना होणाऱ्या उत्तर प्रदेश, बिहारमध्ये महिला मुख्यमंत्री झाल्या. मात्र, प्रगत व पुरोगामी महाराष्ट्रात हे घडले नाही, ही सर्वांनीच विचार करण्याजोगी बाब आहे. राजकारणात महिलांना आरक्षण आहे, म्हणून कमीतकमी त्यांची संख्या तरी दिसून येते. मात्र, बऱ्याच महिलांना राजकारणाची ओळख नसते व त्या पती किंवा कुटुंबीयांच्या निर्देशांनुसार काम करत असतात.
राज्याला ‘रबरस्टॅम्प’ असणाऱ्या मुख्यमंत्री किंवा मंत्री नको आहे. महिलांचा राजकारणात टक्का वाढलाच पाहिजे. त्यासाठी जात पितृसत्ताक व्यवस्था दूर सारायला हवी व महिलांनाही कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी दिली पाहिजे, असे मत या मान्यवरांनी व्यक्त केले. ‘लोकमत’च्या पुणे आवृत्तीचे संपादक संजय आवटे व नागपूर आवृत्तीचे कार्यकारी संपादक श्रीमंत माने यांनी या चर्चेचे संचालन केले. लोकमत सखी मंचच्या नेहा जोशी यांनी संचालन तर ‘लोकमत समाचार’चे वरिष्ठ संपादक विकास मिश्रा यांनी आभार प्रदर्शन केले. दरम्यान, विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या १४ कर्तृत्ववान महिलांना विदर्भस्तरीय लोकमत ज्योत्स्ना सखी सन्मान पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.
अमृता फडणवीसांचे सुषमा अंधारेंकडून कौतुक
सुषमा अंधारे यांच्याकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचे जाहीरपणे कौतुक करण्यात आले. अमृता फडणवीस या उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नी असूनही त्यांनी ठरावीक चौकटीतून बाहेर येत स्वत:चे करिअर व छंद जोपासले. त्यांना ज्या गोष्टी पटतात, त्या करतात. लोकांना काय वाटेल, याचा विचार करण्यातच महिलांचे आयुष्य जाते. मात्र, अमृता फडणवीस या वेगळ्या आहेत.
त्यांनी अनेक परंपरांना छेद दिला आहे, असे अंधारे म्हणाल्या. यावेळी त्यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यावरही भाष्य करत त्यांची बाजू घेतली. ‘मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहे,’ असे म्हटले, म्हणून त्यांना राजकारणातून संपविण्याचा प्रयत्न होत असेल, तर कोणी महिला कशाला ते स्वप्न पाहील,’ असा सवाल सुषमा अंधारे यांनी केला.
नेतृत्व करू शकणारी एकही महिला नाही
आश्चर्याची बाब म्हणजे, या सर्वपक्षीय महिला नेत्यांनी सद्य:स्थितीत राज्यात मुख्यमंत्रिपद सांभाळत नेतृत्व करू शकणारी एकही महिला नसल्याचे प्रतिपादन केले. भविष्यात नक्कीच महिला मुख्यमंत्री मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त केला. ‘रॅपिड फायर राउंड’मध्ये तुमच्या मनातील मुख्यमंत्री सांगा, या मुद्द्याला महिला नेत्यांनी बगल दिली. सध्याची एकूण स्थिती पाहता, केवळ शिवसेनेच्या नेत्या व विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे नाव महिला मुख्यमंत्रिपदासाठी योग्य ठरू शकते, असे मत प्रा.तांबे यांनी व्यक्त केले.