नागपुरातच कायम राहणार राज्य क्षयरोग औषधी भांडार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2022 03:54 PM2022-03-14T15:54:33+5:302022-03-14T16:01:00+5:30
२०११ पासून औषधी भांडार व प्रयोगशाळा मेडिकलच्या टीबी वॉर्ड परिसरात कार्यरत आहे.
नागपूर : राज्य क्षयरोग नियंत्रण व प्रशिक्षण केंद्र नागपूरच्या राज्य औषधी भांडाराची इमारत मोडकळीस आल्याने बांधकाम विभागाने इमारत पाडण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामुळे येथून २२ जिल्ह्यांना होणारा क्षयरोग औषधांचा पुरवठा ठप्प पडण्याची दाट शक्यता होती. परंतु आता आरोग्य विभागाच्या उपसंचालक कार्यालयाच्या परिसरात (माता कचेरी) जागा उपलब्ध झाल्याने राज्याचे हे औषधी भांडार नागपुरातच राहणार आहे.
क्षयरोगाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. महाराष्ट्रात २०१७ मध्ये १,६४,७४३ रुग्ण होते. आता हा आकडा ३ लाखांच्या जवळ पोहोचला आहे. क्षयरोग हा औषधोपचाराने बरा होतो. नऊ महिन्यांपासून ते दीड वर्षापर्यंत क्षयरोगावर नियमित औषधोपचार आवश्यक आहेत. औषधी मध्येच बंद केल्यास शरीरातील जंतू टीबीच्या औषधांना पुन्हा दाद देत नाहीत. यावरून नागपूरच्या राज्य औषधी भांडाराचे महत्त्व कळते. परंतु मेडिकलच्या टीबी वॉर्ड परिसरात असलेली भांडाराची इमारतच मोडकळीस आल्याने बांधकाम विभागाने इमारत रिकामी करण्याची नोटीस बजावली आहे.
यामुळे मागील पाच महिन्यांपासून नव्या जागेचा शोध घेतला जात होता. अखेर माता कचेरी कार्यालयाच्या परिसरात जागा उपलब्ध झाली. दरम्यान, बांधकाम विभागाने मोडकळीस आलेल्या इमारतीची डागडुजी करून दिली. यामुळे नवी इमारत निर्माण होईपर्यंत औषधी भांडाराचे कामकाज जुन्याच इमारतीतून चालणार आहे.
नव्या बांधकामाचा पाठविला प्रस्ताव
सहायक संचालक (क्षयरोग) डॉ. विजय डोईफोडे यांनी ‘लोकमत’ला सांगितले, राज्य क्षयरोग नियंत्रण व प्रशिक्षण केंद्र, नागपूरच्या वतीने आरोग्य सेवाच्या राज्य औषधी भांडारातून विदर्भासह मराठवाड्यातील जिल्ह्यांना डॉट प्लस औषधांचा पुरवठा केला जातो. २०११ पासून औषधी भांडार व प्रयोगशाळा मेडिकलच्या टीबी वॉर्ड परिसरात कार्यरत आहे. इमारत मोडकळीस आल्याने ७ कोटी ३० लाख अपेक्षित खर्च असलेल्या नव्या इमारतीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. यामुळे लवकरच भांडार माता कचेरी परिसरात स्थलांतरित होईल. मात्र, क्षयरोगाची प्रयोगशाळा टीबी वॉर्ड परिसरातच कार्यरत राहील.