९० टक्के मिळवण्याच्या धास्तीने विद्यार्थिनीने सोडले घर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2022 10:09 PM2022-03-02T22:09:38+5:302022-03-02T22:10:16+5:30
Nagpur News परीक्षेत ९० टक्के गुण घेण्याच्या दबावामुळे दोन दिवसांपूर्वी रायपूरमधून पळालेल्या एका विद्यार्थिनीला मंगळवारी रात्री नागपूर स्टेशनवर उतरवून सुरक्षेत घेण्यात आले.
नागपूर : परीक्षेत ९० टक्के गुण घेण्याच्या दबावामुळे दोन दिवसांपूर्वी रायपूरमधून पळालेल्या एका विद्यार्थिनीला मंगळवारी रात्री नागपूर स्टेशनवर उतरवून सुरक्षेत घेण्यात आले. या मुलीचे वय १७ वर्षे असून ती एका संपन्न परिवारातील आहे.
मंगळवारी रेल्वे सुरक्षा दल व रेल्वे पोलिसांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर एका विद्यार्थिनीचा शोध घेण्याबाबत छायाचित्रासह मॅसेज आला. त्यानंतर इतवारीचे आरपीएफ व जीआरपीने मुलीचा शोध सुरू केला. विद्यार्थिनी रायपूर-सिकंदराबाद रेल्वेने जात होती. माहितीच्या आधारावर सोमवार-मंगळवारदरम्यान रात्री तिला नागपूर रेल्वे स्टेशनवरील फलाट क्रमांक ८ वर उतरविण्यात आले. रेल्वे सुरक्षा दलातील सूत्रानुसार विद्यार्थिनीचे आईवडील महासमुंद (छत्तीसगड) येथे राहतात. तर विद्यार्थिनी रायपूरमध्ये आपल्या नातेवाइकाकडे राहते. नागपुरातही त्यांचे जवळचे नातेवाईक राहतात. विद्यार्थिनीला सुरक्षेत घेतल्यानंतर तिला तिच्या नागपुरात राहणाऱ्या नातेवाइकाकडे सोपवण्यात आले.
रात्रीच्या वेळी एकटीच निघालेली ही विद्यार्थिनी एखाद्या संकटात सापडू शकली असती, परंतु रेल्वे सुरक्षा दलाने समन्वयाने काम करीत तिला सुरक्षितपणे नागपुरात उतरविले.