फेरीवाल्यांच्या कर्कश भाेंग्यांनी विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचा खाेळंबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2023 08:24 PM2023-02-06T20:24:32+5:302023-02-06T20:31:49+5:30
Nagpur News सद्य:स्थितीत विद्यार्थी सराव परीक्षा आणि अभ्यासात व्यस्त आहेत. अशा स्थितीत काेणताही व्यत्यय त्यांच्या अभ्यासावर परिणाम करू शकताे. असे असताना फेरीवाल्यांच्या भाेंग्यांच्या ध्वनी प्रदूषणाने विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
नागपूर : सीबीएसई आणि महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सध्याचा काळ अतिशय निर्वाणीचा आहे. फेब्रुवारीमध्ये बारावी आणि मार्चमध्ये दहावीची परीक्षा सुरू हाेत आहे. सद्य:स्थितीत विद्यार्थी सराव परीक्षा आणि अभ्यासात व्यस्त आहेत. अशा स्थितीत काेणताही व्यत्यय त्यांच्या अभ्यासावर परिणाम करू शकताे. असे असताना फेरीवाल्यांच्या भाेंग्यांच्या ध्वनी प्रदूषणाने विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
पूर्वी आवाज देऊन माल विकणाऱ्या फेरीवाल्यांनी त्यांच्या ठेल्यावर भाेंगे लावून घेतले आहेत. रोजच्या वापरातील भाजीपाला- फळ विक्रीपासून कपडे,ब्लँकेट,चादरी,भांडे, भंगार खरेदीदार,विक्रेत्यांनी धुमाकूळ घातला आहे. त्यांच्या भाेंग्यावर कधी माेठमाेठ्याने गाणी सुरू असतात किवा त्यांच्या मालाची जाहीरात सुरू असते. किरकाेळ विक्रेते तर भाेंग्यावर गाणी वाजवितच गल्लीबाेळात फिरत असतात. अगदी पहाटेपासून शहराच्या जवळपास सर्वच भागात फेरीवाल्यांनी अगदी धुमाकूळ घातला आहे. सायकल, चारचाकी वाहन, दुचाकी, इलेक्ट्रिक रिक्षा, ऑटोरिक्षा, व्हॅन अशा वाहनांवर लहान भोंगे लावून मोठ्या आवाजात आपल्या वस्तूंचा, मालाचा प्रचार करत असल्याचे सर्रास दिसून येते. हा प्रकार रात्री सुद्धा अनुभवास येत आहे. त्यांच्या भोंग्याच्या मोठ्या आवाजामुळे विद्यार्थ्यांना अतिशय त्रास होत आहे. केवळ विद्यार्थी नव्हेच,तर रुग्ण,वृद्ध व्यक्ती ही मंडळी सुद्धा त्रस्त झाल्याचे आढळून आले.
दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचा खाेळंबा हाेत आहे. बाहेरचा भाेंगा थाेडा वेळ वाजताे,असे वाटत असले तरी एक गेला की दुसरा व दुसरा गेला की तिसरा येण्याचा प्रकार सुरू असताे. दुपारचा काही काळ साेडला तर सकाळी आणि सायंकाळी या भाेंग्यांची तीव्रता अधिक असते. या भोंग्याच्या आवाजाचा विलक्षण असा त्रास होत आहे. या भाेंगे लावणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई काेण करणार, हा प्रश्नच आहे.
उपरोक्त व्यावसायिकांना विरोध नसला तरी ते वापरत असलेल्या भाेंग्यांचा मनस्वी वैताग विद्यार्थ्यांना हाेत आहे. त्यामुळे नागपूर महानगरपालिका प्रशासनाने या विरोधात तात्काळ कारवाई करणे अपेक्षित आहे,जेणेकरून विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी व्यत्यय होणार नाही.
संजय मुंदलकर,संयाेजक एज्यू अलर्ट शैक्षणिक दक्षता संस्था.