‘त्या’ युवकाची आत्महत्या ‘एमडी’ विक्रेत्याच्या वसुलीच्या त्रासामुळेच
By दयानंद पाईकराव | Published: June 29, 2023 02:30 PM2023-06-29T14:30:54+5:302023-06-29T14:33:34+5:30
मृतकाच्या भावाची तक्रार : आरोपी एमडी विक्रेत्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल
नागपूर : एमडीचे व्यसन लावले. त्यानंतर उधारीवर एमडी देऊन पैशांसाठी त्रास दिल्यामुळे एका २४ वर्षाच्या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. मृतक युवकाच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून लकडगंज पोलिसांनी एमडी विक्रेत्या आरोपीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
रविवारी २५ जूनला रात्री एक वाजता अनुज अजय गुप्ता (वय २४, रा. श्री तुलसी निवास, नेहरु पुतळाजवळ, लकडगंज) याने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. मृत अनुजला दारु, सिगारेट व एम. डीचे व्यसन होते. त्याला कुटुंबातील सर्वांनी समजविले होते. तो नेहमी तणावात राहत होता. घटनेच्या दिवशी त्याने सुसाईड नोट लिहून आरोपी सोहेल इद्रीस मिर्झा (वय २७, रा. मानकापूर) याने आपणास एमडीचे व्यसन लावले. त्यानंतर तो आपणास एमडी उधारीत देत होता.
एमडीच्या पैशांसाठी तगादा लाऊन घरी येऊन वसुली करण्याची धमकी देऊन तो नेहमीच शिविगाळ करीत होता. त्यामुळे तणावातून अनुजने आत्महत्या केल्याची तक्रार त्याचा भाऊ सार्थक (वय २७) याने लकडगंज पोलिसांना दिली. त्यावरून लकडगंज पोलिसांनी आरोपी सोहेलविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी कलम ३०६ नुसार गुन्हा दाखल केला आहे.