सूर्याने ताप वाढविला, हवामान खाते म्हणते पाऊस येईल
By निशांत वानखेडे | Published: February 22, 2024 09:05 PM2024-02-22T21:05:04+5:302024-02-22T21:05:18+5:30
रविवारपासून गडगडाटीसह पावसाची शक्यता : दिवसरात्रीच्या तापमानात अंशत: घट.
नागपूर : हवामान विभागातर्फे २१ फेब्रुवारीपासून थंडी जाणवेल, असा अंदाज व्यक्त केला हाेता. मात्र थंडीऐवजी सूर्याचा ताप अधिक वाढल्याचे तीन दिवसांपासून जाणवत आहे. गुरुवारी उन्हाचे चटके अधिक तीव्र वाटत हाेते. असे असताना दाेन दिवसानंतर रविवारपासून गडगडाटीसह अवकाळी पाऊस विदर्भात व राज्यातील काही भागात हजेरी लावेल, असा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे.
गेल्याच आठवड्यात विदर्भातील बहुतेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली हाेती. त्यामुळे बहुतेक भागातील रबीची पिके, भाजीपाला व संत्रा-माेसंबीच्या बहाराला फटका बसला हाेता. साडेतीन हजार हेक्टरवरील पिके भुईसपाट झाली हाेती. या पावसानंतर मात्र उन वाढत गेले. नागपूरसह बहुतेक जिल्ह्यात पारा ३५ ते ३६ अंशापर्यंत पाेहचला आहे. त्यामुळे हिवाळा संपण्याआधी उन्हाळा सुरू झाल्याची जाणीव हाेत आहे. मात्र आता फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात रविवार २५ ते २७ या तीन दिवस ढगाळ वातावरण राहून तुरळक ठिकाणी गडगडाटीसह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे थंडी वाढणार नसली तरी किमान पावसामुळे तरी उन्हापासून दिलासा मिळेल, असा अंदाज आहे. मात्र या पावसामुळे शेतातील गहू, हरभरा व भाजीपाल्याचे नुकसान हाेण्याची भीती आहे. शिवाय अवकाळी पाऊस जाेरात झाला तर संत्रा, माेसंबी व आंब्याचा बहार गळण्याची भीती आहे. वेचणी व्हायची असल्याने शेतात कापूस भिजण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतात काढलेल्या पिकांचे याेग्य व्यवस्था करावी, झालेल्या पिकाची कापणी करावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
दरम्यान गुरुवारी विदर्भातील सर्व जिल्ह्यात कमाल व किमान तापमानात घसरण झाली. नागपूरला दिवसाचा पारा १.८ अंश घटून ३३.२ अंश नाेंदविण्यात आला. रात्रीचा पारा मात्र अंशत: चढला व १७.६ अंशाची नाेंद झाली. वाशिममध्ये सर्वाधिक ३५.६ अंश व चंद्रपुरात ३५ अंश कमाल तापमानाची नाेंद झाली. बुलढाणा सर्वात कमी २९.६ अंश नाेंदविण्यात आले. ३६ अंशाच्या वर गेलेला अकाेला दाेन दिवसात घसरत ३३.१ अंशावर आला. सर्वच जिल्ह्यात रात्रीचा पारा १७ ते १८ अंशाच्या सरासरीत आहे. तापमान घटले असले तरी उन्हाळयाप्रमाणे उन्हाचे चटके तीव्रपणे जाणवत आहेत.