सूर्यावर स्फाेट वाढले, ज्वाळांची धग पृथ्वीपर्यंत; भारतासारख्या उत्तर कटिबंधीय देशांवर प्रभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2022 07:00 AM2022-04-17T07:00:00+5:302022-04-17T07:00:02+5:30
Nagpur News २०२५-२६ पर्यंत स्फाेट व ज्वाळांच्या वादळाची तीव्रता अति राहणार आहे. यावर्षी फेब्रुवारीमध्ये सूर्यावर ५० स्फाेट झाल्याचा अंदाज असून त्याचा प्रभाव आता दिसून येत आहे.
निशांत वानखेडे
नागपूर : गेल्या काही वर्षामध्ये सूर्यावर स्फाेटांची मालिका वाढली आहे. या स्फाेटामुळे अग्नीच्या ज्वाळा सूर्याच्या बाह्य आवरणातून बाहेर फेकल्या जात आहेत. या ज्वाळा पृथ्वीपर्यंत पाेहचत नसल्यातरी स्फाेटांमुळे साैर वात पृथ्वीच्या आवरणापर्यंत पाेहचत आहे. यामुळे पृथ्वीच्या कक्षेत फिरणाऱ्या सॅटेलाईटच्या कार्यावर आणि आपल्याकडे इलेक्ट्रिक उपकरणांवर परिणाम हाेण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. चक्रीवादळे वाढण्याचाही धाेका व्यक्त केला जात आहे.
सूर्यावर स्फाेट आणि शक्तिशाली ज्वाळांची वादळे तयार झाल्याची बातमी ‘लाेकमत’ने नाेव्हेंबर २०२१ ला प्रकाशित केली हाेती. या स्फाेटांची वारंवारता व तीव्रता अधिक वाढल्याचे निरीक्षण खगाेल वैज्ञानिकांनी नव्याने नाेंदविले आहे. नुकतेच ३१ मार्च आणि १४ एप्रिल राेजी सूर्यावर प्रचंड स्फाेट हाेत असल्याचे दिसून आले.
खगाेल अभ्यासक प्रा. सुरेश चाेपणे यांनी या घडामाेडीबाबत विश्लेषण मांडले. सूर्यावर दर ११ वर्षांनी मिनिमम (किमान) व मॅक्सिमम (कमाल) अशी सायकल चालते. साैर किमानमध्ये सूर्यावरील घडामाेडी कमी हाेतात. ही ११ वर्षांची साेलर मिनिमम सायकल २०१९ ला संपली व साेलर मॅक्सिममची सायकल सुरू झाली आहे. यामुळे स्फाेटांच्या घडामाेडी वाढल्या आहेत. या पुढे २०३० पर्यंत चालणार असून २०२५-२६ पर्यंत स्फाेट व ज्वाळांच्या वादळाची तीव्रता अति राहणार आहे. यावर्षी फेब्रुवारीमध्ये सूर्यावर ५० स्फाेट झाल्याचा अंदाज असून त्याचा प्रभाव आता दिसून येत आहे.
सूर्याच्या पृष्ठभागावरून पृथ्वीच्या आकाराएवढा तरल पदार्थ (मॅग्मा) बाहेर पडताे. त्यामुळे प्रकाश कमी हाेताे व सूर्यावर काळे डाग (सन स्पाॅट) दिसायला लागतात. स्फाेटांच्या मालिकांमुळे बाहेर फेकलेल्या साैर ज्वाळा शुक्र ग्रहापर्यंत पाेहचत असल्याचे दिसून येत आहे. याला ‘काेराेनल मास इजेक्शन’ (सीएमई) म्हणतात. साैर ज्वाळा येत नसल्या तरी साैर वात (साेलर विन्ड) पृथ्वीच्या वरील स्तरापर्यंत (स्पेस वेदर) पाेहचत असून त्यामुळे तापमान वाढले आहे. सीएमई किती दूरपर्यंत पाेहचू शकतात, याकडे वैज्ञानिकांचे लक्ष लागले आहे.
उपग्रह, इलेक्ट्रिक वस्तूंवर परिणाम
सूर्य सध्या विषुववृत्तीय भागातून म्हणजे भारतासारखे देश असलेल्या भागातून मार्गक्रमण करीत आहे. त्यामुळे त्याचा अधिक परिणाम आपल्याला जाणवणार आहे. यामुळे पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणावर (जिओ मॅग्नेटिक) परिणाम हाेऊन चक्रीवादळे येण्याची शक्यता प्रा. सुरेश चाेपणे यांनी व्यक्त केली. याशिवाय फिरत असलेल्या सॅटेलाईटच्या इलेक्ट्रानिक यंत्रणेत बिघाड हाेण्याची शक्यता आहे. इलेक्ट्रिक उपकरणांवरही परिणाम हाेऊन ब्लॅक आऊट हाेण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली.
आधीच ग्लाेबल वाॅर्मिंगचा धाेका वाढला असताना पुन्हा साैर ज्वाळांचे नवे संकट उभे आहे. हे संकट किती प्रभाव पाडणार हे सांगता येणार नाही; पण सर्व देशांच्या यंत्रणांनी सावध हाेण्याची गरज आहे.
- प्रा. सुरेश चाेपणे, खगाेल अभ्यासक