स्वामीत्व योजनेतून ग्रामीण भागातील जनतेचे आयुष्य बदलणार
By आनंद डेकाटे | Updated: January 18, 2025 17:39 IST2025-01-18T17:36:51+5:302025-01-18T17:39:06+5:30
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे : जिल्ह्यातील लाभार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरूपात सामीत्व योजनेच्या लाभाचे वाटप

The Swamitva Yojana will change the lives of people in rural areas
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्याला त्याच्या मालकीच्या जागेचे कायदेशीर सामीत्व मिळावे यासाठी स्वामित्व योजना सुरू केली आहे. ग्रामीण भागातील जनतेचे आयुष्य बदलविणारी ही योजना आहे. या योजनेमुळे कायदेशीर मालकत्व प्राप्त होणार आहे. बँकेचे कर्ज घेण्यासह विविध योजनांचा लाभ मिळण्यास मदत होणार असल्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
वनामती येथील सभागृहात शनिवारी सामीत्व योजनेच्या लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात लाभाचे वाटप करण्यात आले. त्यावेळी महसूलमंत्री बावनकुळे बोलत होते. यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे जिल्ह्यातील लाभार्थ्याशी संवाद साधला.
कार्यक्रमाला खासदार शामकुमार बर्वे, आमदार कृष्णा खोपडे, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खांडे, भूमी अभिलेख विभागाचे उपसंचालक विष्णू शिंदे, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख अभय जोशी, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कपिल कलोडे उपस्थित होते. यावेळी जिल्ह्यातील सहा लाभार्थ्यांना सामीत्व योजनेच्या लाभाचे प्रातिनिधीक स्वरूपात वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन राजेश पांडे यांनी केले.
स्वामीत्व योजनेचे फायदे
- स्वामित्व (सनद) ही शासनाने नागरीकांना दिलेला हक्काचा पुरावा आहे.
- यात धारकांचे नाव, क्षेत्र, नगर भूमापन क्रमांक, चतुः सीमेनुसार नकाशा दिलेला असतो.
- हा मालकी हक्काचा पुरावा असल्याने कोणत्याही शासकीय कामकाजासाठी तो ग्राह्य धरला जातो.
- या आधाराने धारकाला कर्ज उपलब्धता होईल.
- सनद धारकाला शासनाच्या विविध आवास योजनेच्या मंजूरी कामी फायदा मिळेल.
- यामुळे खरेदी-विक्री व्यवहारात पारदर्शकता येऊन नागरीकांची फसवणूक टळेल.
- सनद ही अहस्तंतरणीय असल्याने धारकास कायमस्वरूपी वंशपरंपरागत मालकी हक्काचा पुरावा शासनाकडुन मिळेल.