गडचिरोलीच्या मोदकाचा गोडवा बहरला नागपुरात
By मंगेश व्यवहारे | Published: September 25, 2023 11:41 AM2023-09-25T11:41:28+5:302023-09-25T11:51:07+5:30
जीवनगट्टाच्या महिला बचत गटाकडून मोहाच्या मोदकाची निर्मिती
मंगेश व्यवहारे
नागपूर : शहरात राहणाऱ्या लोकांच्या मानसिकतेत मोह हे केवळ दारूसाठी उपयोगात आणले जाणारे फूल. गडचिरोली जिल्ह्यातील जीवनगट्टाच्या महिला बचत गटाने मोहाच्या बाबतीत शहरी माणसांची मानसिकताच बदलविली आहे. गणपतीसाठी खास मोहाचे मोदक तयार करून शहरातील गणेश भक्तांसाठी खास आणले आहे. गणपती उत्सवात जीवनगट्टाच्या महिला बचत गटांनी बनविलेले दररोज ५ किलोचे मोदक नागपुरात विकले जात आहेत.
मोहाची फुले अनेक उपचारांसाठी वापरली जातात. मोहाचे औषधी गुणधर्म शरीरात रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करतात. कारण मोह फुलांमध्ये प्रथिने, साखर, कॅल्शियम, फॉस्फरस आणि चरबी असते. फुलांमध्ये ‘सी’ जीवनसत्व भरपूर असून, प्रतिकारकतेसाठी फायदेशीर आहे. पण, जिथे मोह फुलते तिथे त्याची जाणीवच नाही. मोहाच्या फुलांचे महत्त्व आदिवासींना पटवून देण्यासाठी आणि मोह आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे, याची जाणीव शहरी लोकांना करून देण्यासाठी वैभव मडावी हे कार्य करत आहेत.
वैभव यांच्या मदतीने गडचिरोलीच्या एटापल्ली तालुक्यातील आदिवासी लक्ष्मी महिला बचत गटाने मोह फुलांपासून गोड पदार्थांची निर्मिती करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला त्यांनी मोहापासून लाडू आणि पेढे बनविले. अपर आदिवासी आयुक्त कार्यालयातील राणी हिराई आदिवासी वस्तू विक्री केंद्रात त्यांची विक्री सुरू केली. त्या लाडू आणि पेढे यांना प्रचंड प्रतिसाद मिळाला. लोकांनी गणेशोत्सवाला त्यांच्याकडे मोहाच्या मोदकाची मागणी केली. वैभव यांनी बचत गटाच्या माध्यमातून ती पूर्णही केली. अपर आदिवासी आयुक्त रवींद्र ठाकरे यांनी मोहाचे मोदक विशेष पार्सल करून नेले. त्याच माध्यमातून मोहाचे मोदक गणेश भक्तांच्या घरीही पोहोचले.
- साखरेची गरज नाही, मोहाचा गोडवा मोदकात येतो
महिला बचत गटाच्या प्रमुख वंदना गावडे या मोहापासून मिठाई तयार करतात. त्यांनी गावातील १० महिलांचा बचत गट तयार केला आहे. मार्च व एप्रिल महिन्यात निघणारे मोह फूल वर्षभर पुरतील एवढ्या प्रमाणात साठवून ठेवतात. त्याला ड्रायरमध्ये सुकवून मोहाचे पिठ तयार करतात. मोदक तयार करताना त्यांनी मोह पिठात ड्रायफ्रूट, गाईचे तूप, नाचणीचे पिठ एवढ्याच वस्तू घातल्या आहेत आणि मोहाचा गोडवा मोदकात आला आहे.
पूर्वी या महिला बचत गटाच्या महिला मोह गोळा करून त्या विकायच्या. त्यांना थोडेफार प्रशिक्षण देऊन मिठाई तयार करण्यास प्रोत्साहन दिले. आजच्या घडीला महिन्याला ३०० किलो लाडूंची नागपुरात विक्री होते. या माध्यमातून महिलांनाही चांगला स्वयंरोजगार मिळाला आहे.
- वैभव मडावी, विक्रेते