आर्द्रता वाढताच चढला तापमानाचा पारा; कमाल तापमान २९.७ डिग्रीवर पोहोचले
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2023 03:02 PM2023-01-18T15:02:44+5:302023-01-18T15:57:24+5:30
नागपूरसह विदर्भात सद्य:स्थितीत गारठा वाढण्याची शक्यता कमी
नागपूर : वातावरणातून गारवा हळूहळू गायब होत असल्याचे दिसून येत आहे. दिवसाच्या तापमानात १.५ तर रात्रीच्या तापमानात ०.५ अंश सेल्सिअस वाढ नोंदविण्यात आली आहे. वातावरणातील आर्द्रतेचा स्तर वाढल्याने पारा वर चढायला लागला आहे. मंगळवारी कमाल तापमान २९.७ तर किमान तापमान १४.३ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले
हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये तयार झालेल्या वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे आर्द्रतेचे स्तर वाढले आहे. त्यातच वेस्टर्न हिमालयन रिजनमध्ये २० जानेवारीपासून नवा डिस्टर्बन्स तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे, नागपूरसह विदर्भात सद्य:स्थितीत गारठा वाढण्याची शक्यता कमी आहे.
नागपुरात सकाळी ६७ टक्के आर्द्रता नोंदविण्यात आली. मंगळवारी १३.२ डिग्री तापमानासह गोंदिया सर्वांत थंड जिल्हा ठरला. विदर्भातील बहुतांश जिल्ह्यातील दिवसाच्या तापमानात अर्धा ते दोन डिग्रीपर्यंत वाढ झाली आहे. मंगळवारी सूर्यास्तानंतरही गारठ्याचा प्रभाव कमी जाणवला. गार वाऱ्याचा प्रभावही ओसरला आहे.