उपराजधानीत पारा ३५ अंशावर, ताप वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2022 10:14 PM2022-02-23T22:14:48+5:302022-02-23T22:15:17+5:30
Nagpur News बुधवारी नागपुरात ३५ अंश तापमानाची नाेंद करण्यात आली. आतापासूनच ताप भडकल्याने भर उन्हाळ्यात काय हाेईल, याची चिंता नागरिकांना लागली आहे.
नागपूर : अद्याप फेब्रुवारी महिना संपण्यास पाच दिवसांचा अवधी असताना सूर्याचा ताप वाढल्याचे दिसत आहे. दिवसाचा पारा सरासरीपेक्षा २.४ अंशाने अधिक असून बुधवारी नागपुरात ३५ अंश तापमानाची नाेंद करण्यात आली. आतापासूनच ताप भडकल्याने भर उन्हाळ्यात काय हाेईल, याची चिंता नागरिकांना लागली आहे.
हवामान विभागाने विदर्भात आठवडाभर तापमान सामान्यपेक्षा ३ ते ५ अंशाने अधिक राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. गेल्या दाेन-तीन दिवसांपासून सूर्याचा प्रकाेप जाणवायला लागला आहे. काही दिवसांपूर्वी हवेसे वाटणारे सकाळचे ऊन आता तीव्र वाटायला लागले आहे. उन्हामुळे दिवसभर गरमीची जाणीव हाेत आहे. मात्र रात्री हवेत गारवा असल्याने तेवढाच दिलासा नागरिकांना आहे. मात्र घरी उष्णतेची जाणीव हाेत आहे. बुधवारी नागपूरला रात्रीचे किमान तापमान १४.४ अंश नाेंदविण्यात आले, ते २४ तासात २ अंशाने वाढले, पण सरासरीपेक्षा १.७ अंश कमी आहे. त्यामुळे हवेत गारवा आहे.
विदर्भातील बहुतेक जिल्ह्यांत दिवसाच्या सरासरी तापमानात २ ते ४ अंशाची वाढ झाली आहे. यवतमाळ, अमरावती, वर्ध्यामध्ये ३६ अंश तापमानाची नाेंद करण्यात आली. ३७.८ अंशासह अकाेला सर्वाधिक तापलेला हाेता. येथे रात्रीच्या तापमानात ३.८ अंशाची वाढ दिसत असून १८.६ अंशाची नाेंद झाली. रात्रीचे किमान तापमान यवतमाळमध्ये २० अंश, बुलडाणा १९.५ अंश, अमरावती १६.५ अंश, तर ब्रम्हपुरीत १५ अंश हाेते. येत्या काळात दिवस आणि रात्रीच्या तापमानात वाढ हाेणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला.