तर नागपूर जिल्ह्यात १ ते २ अंशाने वाढेल तापमान; CSTP संस्थेचा धाेकादायक इशारा
By निशांत वानखेडे | Published: March 10, 2024 06:22 PM2024-03-10T18:22:26+5:302024-03-10T18:22:44+5:30
राज्यात ०.२५ ते ०.४२ अंश वाढीचा अंदाज
निशांत वानखेडे, नागपूर: सेंटर फॉर सायन्स, टेक्नालॅजी अॅण्ड पाॅलिसी या संस्थेने महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याच्या अभ्यासातून धाेकादायक इशारा दिला आहे. महाराष्ट्रात उन्हाळ्याचे तापमान ०.२५ ते ०.४२ अंशाने वाढण्याचा आणि बहुतेक जिल्ह्याचे तापमान प्रदूषणाच्या कमी-अधिक प्रमाणानुसार १ ते २ अंशाने वाढण्याचा इशारा दिला आहे. हिव्वाळ्यात ०.३ ते ०.५५ अंशाने वाढ होण्याची शक्यता आहे.
सातत्याने हाेत असलेले प्रदूषण वाढीमुळे २०५० पर्यंत जागतिक तापमानवाढ दीड नाही तर ३ अंशाने वाढण्याचा इशारा इंटरगव्हर्नमेंटल पॅनल फाॅर क्लायमेट चेंज (आयपीसीसी) ने आधीच दिला आहे. २०३० पर्यंत हाेणारी १ ते १.५ अंश तापमानवाढ २०२३ मध्येच गाठली आहे. भारत देश हवामान जोखीम निर्देशांकात ७ व्या आणि नैसर्गिक आपत्ती निर्देशांकात ३ ऱ्या क्रमांकावर आहे. त्यातही हवामान बदलासाठी विदर्भ आणि मध्य भारत हा अतिशय संवेदनशील भूभाग बनला असून पुढील काळात येथे राहणे कठीण होण्याचा इशारा अनेक संशोधनातून देण्यात आला आहे.
भारतीय हवामान विभागाची आकडेवारी आणि काॅर्डेक्स (काेऑर्डिनेटेड रिजनल क्लायमेट डाउनस्केलिंग एक्सपेरिमेंट) माॅडेलच्या माध्यमातून प्रदूषणाच्या कमी व अधिक प्रमाणानुसार महाराष्ट्रातील सर्वच जिल्हा निहाय खालील अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
१ अंशापेक्षा अधिक डिग्री तापमान वाढीचे जिल्हे : भंडारा-२.०, अकोला-१.३, अमरावती-१.६, नागपूर-१.१, औरंगाबाद-१.१, बीड-१.२, गोंदिया-१.१, बुलढाना-१.४, धुळे-१.१, हिंगोली-१.२, जळगाव-१.३, लातूर-१.४,, नंदुरबार-१.६, उस्मानाबाद-१.४, वर्धा-१.१, वाशीम-१.२, यवतमाळ-१.१ अंश.
- सर्वात कमी तापमान वाढीचे जिल्ह्ये : गडचिरोली,कोल्हापूर ,मुंबई,पालघर, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे.
- सर्वाधिक तापमान असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात मात्र (०.८) तापमान वाढ आणि उष्ण लहरी कमी हाेण्याचा अंदाज आहे.
- प्रदूषण असेच वाढत राहिले तर २०५० पर्यंत सर्वाधिक तापमान वाढ : अकोला-२.५ ,अमरावती -२.९,औरंगाबाद २.९, भंडारा-२.६, बुलढानां -२.३, धुळे २.२, गोंदिया-२.१, हिंगोली-२.२, जळगाव-२.५, जालना-२.७, नागपूर-२.२, नंदुरबार-२.५, नाशिक-२.४, वर्धा-२.१, वाशीम-२.३ डिग्रीने वाढेल.
नागपूरचे प्रदूषण
२०२३ च्या ३६५ दिवसांपैकी केवळ ७० दिवस आरोग्यदायी श्रेणीत. १२५ दिवस हे साधारण प्रदूषणाचे श्रेणीत. १२१ दिवस माफक प्रदूषण, ४६ दिवस अतिशय प्रदूषित श्रेणीत, तर ३ दिवस आरोग्यास हानिकारक श्रेणीत आढळले आहेत.
गेल्या दशकापासून दरवर्षी पृथ्वीचे सरासरी तापमान वाढत असून येणारे प्रत्येक वर्ष हे मागच्या वर्षाचे रेकोर्ड तोडत आहेत. ऋतू बदल,हवामान बदल झाल्याचे हे जिवंत लक्षण आहे. जागतिक हवामान अभ्यास करणाऱ्या संस्थांनी भारताच्या हवामान बदलाविषयी जे अंदाज काढले ते अतिशय धोकादायक आहेत. महाराष्ट्राची ही आकडेवारी धाेक्याचे संकेत आहेत. त्यावर तातडीने उपाय याेजना करण्याची गरज आहे.
- प्रा. सुरेश चाेपणे, हवामान अभ्यासक.