एनव्हीसीसीच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ आता एकच वर्षाचा! - अर्जुनदास आहुजा
By मोरेश्वर मानापुरे | Published: July 3, 2024 11:54 PM2024-07-03T23:54:34+5:302024-07-03T23:54:54+5:30
आहुजा म्हणाले, आठ वर्षांपासून चेंबरची सदस्यत्व मोहीम बंद होती. प्रशासकाने काहीच दिवसांसाठी सदस्यता मोहिम राबविली होती. सभेत चेंबरची सदस्यता पुन्हा सुरू करण्याला मंजुरी दिली. त्यामुळे कुणीही व्यापारी चेंबरचा सदस्य बनू शकतो. त्याला चेंबरच्या सिव्हील लाइन्स येथील कार्यालयात संपर्क साधावा लागेल.
नागपूर : विदर्भातील व्यापाऱ्यांची शिखर संघटना नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सची (एनव्हीसीसी) सदस्यता मोहीम आठ वर्षांनंतर पुन्हा सुरू झाली आहे. विदर्भातील सर्व व्यापाऱ्यांना न्याय मिळावा, या भूमिकेतून एनव्हीसीसीच्या संविधानात दुरुस्ती करण्यात येणार आहे. शिवाय चेंबरच्या अध्यक्षाचा कार्यकाळ आता तीनऐवजी एकच वर्षाचा राहील. दुसऱ्या वर्षीही तो अध्यक्ष होऊ शकतो. पण दोन सत्रानंतर त्याला अध्यक्ष होता येणार नाही. चेंबरच्या कार्यकारिणीच्या द्वितीय कार्यकारिणी सभेत अध्यक्ष अर्जुनदास आहुजा यांनी ही माहिती दिली.
आहुजा म्हणाले, आठ वर्षांपासून चेंबरची सदस्यत्व मोहीम बंद होती. प्रशासकाने काहीच दिवसांसाठी सदस्यता मोहिम राबविली होती. सभेत चेंबरची सदस्यता पुन्हा सुरू करण्याला मंजुरी दिली. त्यामुळे कुणीही व्यापारी चेंबरचा सदस्य बनू शकतो. त्याला चेंबरच्या सिव्हील लाइन्स येथील कार्यालयात संपर्क साधावा लागेल.
चेंबरच्या मागील कार्यकारिणीच्या कार्यकाळात अध्यक्षांची तीन वर्षांसाठी निवड व्हायची. अशी तरतूद कार्यकारिणीने केली होती. सध्याची कार्यकारिणी आपला कार्यकाळ सप्टेंबर २०२५ ला पूर्ण करणार आहे. त्यानंतरची अध्यक्षपदाची निवड एक वर्षासाठी करण्यात येईल. शिवाय एका व्यक्तीचा अध्यक्षाचा कार्यकाळ दोन सत्रांचा राहील. सभेत चेअरमन हे पद हटविण्याचा निर्णय घेण्यात आला. या विषयावर बोर्डात चर्चा केल्यानंतर पुन्हा कार्यकारिणीच्या सभेत ठेवण्यात येणार आहे. चेंबरच्या संविधानात आवश्यक सर्व संशोधन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
सभेत चेंबरचे उपाध्यक्ष फारूकभाई अकबानी, स्वप्निल अहिरकर, सचिव - सुचिन पुनियानी, सहसचिव शब्बार शाकीर, राजवंतपाल सिंग तुली, दीपक अग्रवाल, जनसंपर्क अधिकारी हेमंत सारडा, माजी अयक्ष आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.