वर्गखोलीतील ‘थप्पड की गुंज’ पोहोचली पोलीस ठाण्यापर्यंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2022 08:39 PM2022-07-14T20:39:06+5:302022-07-14T20:40:19+5:30
Nagpur News गणिताऐवजी क्राफ्टचे पुस्तक काढले, या लहानशा कारणावरून एका विद्यार्थ्याला शिक्षिकेने झापड मारल्याचा आरोप त्याच्या आईने केला आहे.
योगेश पांडे
नागपूर : गणिताऐवजी क्राफ्टचे पुस्तक काढले, या लहानशा कारणावरून एका विद्यार्थ्याला शिक्षिकेने झापड मारल्याचा आरोप त्याच्या आईने केला आहे. विरोध म्हणून तक्रारीचा ‘ई-मेल’ केल्यानंतर शाळेने आणखी मन:स्ताप दिल्याची तक्रारदेखील आईने केली आहे. आई-शाळेच्या या वादात मुलाच्या मनात मात्र भीती निर्माण झाली व अखेर त्याचे शाळेत जाणे बंद करावे लागले. यासंदर्भात कपिलनगर पोलीस ठाण्यात शाळा संचालक व शिक्षिकेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, शाळेच्या संचालकांनी या गुन्ह्याचे खंडन केले आहे.
न्यू इतवारी स्टेशन रोड येथील निवासी असलेल्या सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेने साडेसात वर्षाच्या मुलाचा प्रवेश कामगार नगर येथील ब्लॉसम स्कूल येथे केला. तिने केलेल्या तक्रारीनुसार शाळेच्या पहिल्याच दिवशी २० जून रोजी मुलगा रडत रडत घरी आला व शिक्षिकेने मारल्याचे सांगितले. दुसऱ्या दिवशी संबंधित महिला शाळेत पोहोचली असता शिक्षिकेने मी मारलेच नाही अशी भूमिका घेतली. परंतु सीसीटीव्ही फुटेज तपासले असता तिने १२.४० ते १२.५० या दरम्यान झापड मारल्याचे स्पष्ट झाले. मुलाने गणिताऐवजी क्राफ्टचे पुस्तक काढले म्हणून त्याला झापड मारल्याचे शिक्षिकेने कबूल केले. शाळेने मुलाचा सेक्शन बदलण्याचे तोंडी आश्वासन दिले. मात्र त्याची पूर्तता केली नाही. महिलेने शाळेला ई-मेल करत गुगलवर संंबंधित घटना मांडत रिव्ह्यू टाकला. यावरून शाळेतून दुसऱ्या दिवशी फोन आला. महिलेने तिच्या वडिलांना मुलासोबत पाठविले असताना शाळेतील प्रशासनाने मुलाला वर्गखोलीतदेखील जाऊ दिले नाही. जोपर्यंत रिव्ह्यू डिलीट करत नाही, तोपर्यंत त्याला शाळेत घेणार नाही, अशी भूमिका घेतली. महिलेने तक्रार करण्याचा इशारा दिल्यावर त्यांनी मुलाला प्रवेश दिला. मात्र या प्रकारामुळे मुलाच्या मनात धास्ती निर्माण झाली होती व त्याने शाळेत जाणे बंद केले. महिलेने मुलाचा प्रवेश तेथून काढला व त्याला आता दुसरीकडे ऑनलाइन शिक्षण घ्यावे लागत आहे. परंतु शाळेने भरलेले शुल्क परत देण्यास नकार दिला. अखेर महिलेने कपिलनगर पोलीस ठाणे गाठले व तक्रार नोंदविली. पोलिसांनी शाळेचे संचालक व संबंधित शिक्षिकेविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
संबंधित व्हिडीओमध्ये मुलाच्या गालावर मारल्याचे दिसून येत आहे. परंतु त्याची तीव्रता कमी आहे. अशा स्थितीत महिलेने पोलिसांत धाव घेणे व शाळेनेदेखील आडमुठेपणाची भूमिका घेणे या दोन्ही गोष्टी अनेक प्रश्न उपस्थित करणाऱ्या आहेत.
ती झापड नव्हे हलकासा ‘टच’, संचालकांचा दावा
यासंदर्भात शाळेचे संचालक अनुप शहा यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी मुलाला कुठलीही मारहाण झाली नसल्याचा दावा केला. संबंधित शिक्षिकेने केवळ त्याला हलका ‘टच’ केला होता. परंतु महिला राईचा पर्वत करत आहे. शाळेत कुठल्याही मुलाला मारण्यात येत नाही. संबंधित महिलेने माफीनामा मागितला होता. मात्र चूक नाहीच तर माफीनामा कसा लिहून देणार, असा सवाल त्यांनी केला.