अजबच! हनुमंताचा साक्षात्कार झाल्यामुळे चोरट्याने गदा पुन्हा मंदिरात आणून ठेवली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2022 08:27 PM2022-10-10T20:27:55+5:302022-10-10T20:28:39+5:30
चोरी केलेली गदा चोरट्याने पुन्हा मंदिरात आणून ठेवल्याची आगळीवेगळी घटना कन्हान येथे घडली. आपल्याला हनुमंताचा साक्षात्कार झाल्याने असे केल्याचे चोरट्याचे सांगणे होते.
नागपूर : पांदण रोड कन्हान येथे हनुमान मंदिर आहे. या मंदिरातील हनुमानाची एक किलो पितळेची गदा आणि अगरबत्ती पात्र चोरीला गेल्याने खळबळ उडाली होती. विशेष म्हणजे चोरी करण्यापूर्वी चोरट्याने हनुमंताला नमस्कार केला. तिथे ठेवलेला प्रसादही ग्रहण केला होता. यानंतर झोळीत गदा घेऊन तो पसार झाला होता. हा घटनाक्रम मंदिराच्या सीसीटीव्हीत शनिवारी (दि. ८) कैद झाला होता. मात्र, चोरी केल्यानंतर हनुमंतांचा साक्षात्कार झाल्याचे सांगत चोरट्याने सोमवारी (दि.१०) गदा मंदिरात आणून ठेवली. याप्रकरणी कन्हान पोलिसांनी संदीप परसराम लक्षणे (४२, रा. गहूहिवरा) याला ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पांदण रोडवरील हनुमान मंदिरात पुजारी पूजा अर्चा केल्यानंतर काही काळासाठी मंदिर बंद ठेवतो. शनिवारी सायंकाळी सात वाजता मंदिर उघडल्यानंतर पुजाऱ्याला मंदिरातील गदा आणि अगरबत्ती पात्र दिसून आले नाही. चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर मंदिरातील सीसीटीव्हीचे फुटेज तपासण्यात आले. यात एकजण गदा चोरताना दिसून आला. यानंतर मंदिर कमिटीच्या वतीने रविवारी (दि. ९) कन्हान पोलिसांत तक्रार देण्यात आली. यावरून कन्हान पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला होता. मात्र, हनुमंताचा साक्षात्कार झाल्याचे सांगत चोरटा सोमवारी सकाळी साडेअकरा वाजता मंदिरात गदा घेऊन प्रकटला. तिथे उपस्थित मंदिर कमिटीच्या सदस्याने याबाबत पोलिसांना अवगत केले. यानंतर पोलिसांनी मंदिर गाठत त्याला ताब्यात घेतले.
कान्द्रीच्या हनुमान मंदिरातसुद्धा झाली होती चोरी
कांद्री येथील प्राचीन हनुमान मंदिराच्या गर्भगृहातील १९ हजार रुपये किमतीचा हनुमानजींचा २५० ग्रॅमचा चांदीचा मुकुट आणि चार किलो अष्टधातूची घंटा २९ सप्टेंबरला चोरीला गेली होती. याप्रकरणी ग्रामस्थांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती.