भरधाव कारचा थरार, दुचाकीस्वार भाऊबहिणींना पुलावरूनच खाली पाडले
By योगेश पांडे | Published: March 26, 2024 02:55 PM2024-03-26T14:55:17+5:302024-03-26T14:55:32+5:30
पाचपावलीतील घटना : आरोपी दारुच्या नशेत, गाडीतून दारू-चाकू जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : धुळवडीचा दिवस नागपुरसाठी चांगलाच धक्कादायक ठरला. एका भरधाव कारच्या धडकेत पाचपावली उड्डाणपुलावरून दुचाकीस्वार भाऊबहीण थेट खाली पडले. दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. कारचालक दारूच्या नशेत होता व त्याच्या गाडीतून दारूच्या बाटल्या व चाकू जप्त करण्यात आले आहे. या घटनेनंतर घटनास्थळी तणाव निर्माण झाला होता.
मोहम्मद ईरफान सलाउद्दीन अन्सारी (३०, आझाद नगर, टेका, पाचपावली) व फैजिया अन्सारी (२१) असे जखमी भाऊबहिणींचे नाव आहे. तर राहुल नारायण मंगले (४१, श्रीकृष्ण नगर, अयोध्यानगर) हा आरोपी आहे. धुळवडीच्या दिवशी दुपारी तीन वाजताच्या सुमारास दोघेही भाऊ बहीण त्यांच्या दुचाकीवरून कमाल चौकाकडून गोळीबार चौकाकडे चालले होते. त्याचवेळी राहुलने एमएच ३१ बीसी ११८५ ही लाल रंगाची कार दारूच्या नशेत भरधाव वेगात आणली. तो उड्डाणपुलावर रॉंग साईडने कार चालवत होता. त्याचे कारवरील नियंत्रण सुटले आणि थेट ईरफान व फैजिया यांना धडक दिली. कारचा वेग जास्त असल्याने दोघेही भाऊबहीण उड्डाणपुलावरून थेट खालीच पडले. यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना नागरिकांनी मेयो इस्पितळात नेले. तर वाहनचालक दारूच्या नशेत कारमध्येच होता. वेग इतका जास्त होता की पुलावरील कठडेदेखील तुटले. हा प्रकार पाहून उड्डाणपुलावर मोठ्या प्रमाणावर गर्दी जमली. या प्रकाराची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली आहे.
कारमध्ये चाकू व दारूच्या बाटल्या
पोलिसांनी आरोपीच्या कारची झडती घेतली असता डिक्कीत दारूच्या दोन बाटल्या व चाकू आढळून आला. यासाठीदेखील पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा नोंदविला आहे.
पुलाखाली काही सेकंदांनी दोन चिमुकले वाचले
या पुलाच्या खाली रहिवासी वस्ती आहे. तेथील घरांमधील चिमुकले पुलाखाली धुळवड असल्याने पिचकारीने रंग खेळत होते. दोघे भाऊ बहीण खाली पडले त्याच ठिकाणी ते खेळत होते. ते तेथून बाजुला झाले व काही सेकंदांनी भाऊ बहीण वरून खाली पडले. जर चिमुकले खालीच खेळत असते तर त्यांच्या जीवालादेखील धोका निर्माण झाला असता.