बाईकच्या चेनमध्ये हाताचा अंगठा अडकून तुटला
By सुमेध वाघमार | Published: April 20, 2024 08:16 PM2024-04-20T20:16:52+5:302024-04-20T20:17:35+5:30
-अंगठ्याच्या पुर्नरोपणाची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया केली यशस्वी
नागपूर : स्पोर्ट्स बाईक सुरू करून चेनला कापडाने ग्रीसिंग करताना अचानक कापड अडकून युवकाचा अंगठा गाडीच्या चेनमध्ये ओढला गेला. परिणामी उजव्या हाताचा अंगठा तुटला. त्याच अवस्थेत त्याला मध्यप्रदेशहून नागपुरात आणले. डॉक्टरांनी वेळ न घालविता अंगठ्याच्या पुर्नरोपणाची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी केली. हाताचे प्रतिनिधीत्व करणारा अंगठा वाचवित डॉक्टरांनी त्या युवकाचे भवितव्यही सुरक्षित केले.
मध्यप्रदेशातील २० वर्षीय संजय (बदलेले नाव) हा फार्मसीचा विद्यार्थीे. चार दिवसांपूर्वी सायंकाळी तो आपली स्पोर्टस् बाईक स्वत:च सर्व्हिसिंग करत होता. त्याने गाडी सुरू करून कापडाने चेनला ग्रीस लावत होता. अचानक कापड चेनमध्ये अडकून त्याचा हातही ओडला गेला. त्याचा उजव्या हाताचा अंगठा चेनमध्ये अडकू न अर्ध्यापेक्षा जास्त तुटला. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. मज्जातंतूंच्या ऊतींना आणि रक्तवाहिन्यांना गंभीर दुखापत झाली. सुरुवातीला, कुटुंबीयांनी स्थानिक रुग्णालयात धाव घेतली. परंतु, तेथील डॉक्टरांनी नागपुरात नेण्याचा सल्ला दिला. नातेवाइकांनी क्रिम्स हॉस्पिटल्ससोबत संपर्क साधला. रुग्णाची माहिती दिली. डॉक्टरांनी तुटलेल्या अंगठा आणि रुग्णाच्या संदर्भात आवश्यक खबरदारीच्या सूचना दिल्या. हॉस्पिटलमध्ये तातडीच्या शस्त्रक्रियेसाठी शस्त्रक्रिया विभागाची चमू, वैद्यकीय पथक कार्यक्षमतेने आणि कौशल्याने कामाला लागले. रात्री रुग्ण पोहचताच कागदपत्रांशी संबंधित कोणताही विलंब टाळून, १० मिनिटांत शस्त्रक्रिया सुरू झाली. अत्याधुनिक सर्जिकल मायक्रोस्कोपचा वापर करून जटिल अशी अंगठ्याची पुनर्रोपण शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली.
-दोन दिवसांनी दिली सुटी
हॉस्पिटलचे संचालक डॉ. अशोक अरबट यांनी सांगितले, उजव्या हाताचा अंगठा नसेल तर दैनंदिन कामकाजासह अनेक छोट्याछोट्या गोष्टी करणे कठीण होतात. रुग्णाच्या नातेवाइकांनी दाखवलेली तत्परता आणि शस्त्रक्रिया विभागाची अचूकता, उपलब्ध अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सर्वसमावेशक टीमवर्कमुळे रुग्णाचे भवितव्य सुरक्षित होऊ शकले. शस्त्रक्रियेच्या दोन दिवसानंतर रुग्णाला सुटीही देण्यात आली.