काेअर झाेनमध्ये पर्यटन बंदीचा निर्णय व्याघ्र प्राधिकरणाने फिरविला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2022 09:08 PM2022-03-10T21:08:50+5:302022-03-10T21:10:10+5:30
Nagpur News व्याघ्र संवर्धन याेजनेची (टीसीपी) मंजुरी मिळालेल्या प्रकल्पांना काेअर क्षेत्रात पर्यटनाची परवानगी देण्याचा नवा आदेश एनटीसीएने जारी केला आहे.
नागपूर : देशातील सर्व व्याघ्र प्रकल्पांच्या काेअर झाेनमधील पर्यटन पूर्णपणे बंद करण्याबाबत घेतलेला निर्णय राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणने (एनटीसीए) स्वत:च फिरविला. आता व्याघ्र संवर्धन याेजनेची (टीसीपी) मंजुरी मिळालेल्या प्रकल्पांना काेअर क्षेत्रात पर्यटनाची परवानगी देण्याचा नवा आदेश एनटीसीएने जारी केला आहे.
उल्लेखनीय म्हणजे, महसूल बुडण्याच्या भीतीने व्याघ्र प्रकल्प व्यवस्थापन, वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पर्यटन बंदीच्या आदेशाची अंमलबजावणी केली नाही. दुसरीकडे जंगलात रिसाॅर्ट तयार करून गुंतवणूक केलेल्या रिसाॅर्ट लाॅबीकडूनही दबाव असल्याचे बाेलले जात हाेते. ५ जानेवारी ला एनटीसीएची १९ वी बैठक पार पडली. या बैठकीत व्याघ्र प्रकल्पातील काेअर क्षेत्रात पूर्णपणे ‘नाे एन्ट्री झाेन’ असावे, असे आदेश काढण्यात आले. बफर झाेन व उर्वरित क्षेत्रातच पर्यटनाला परवानगी देण्यात यावी, असे आदेश काढण्यात आले हाेते. मात्र एनटीसीएने ९ मार्चला नवीन आदेश जारी केला असून, टीसीपी मंजुरी असलेल्या प्रकल्पांमध्ये पर्यटनाची परवानगी देण्यात आली आहे.
वाघ संवर्धन याेजनेतच समावेश
-व्याघ्र प्रकल्पांच्या व्याघ्र संवर्धन याेजनेच्या (टीसीपी) नियमावलीमध्ये आधीच वाघांच्या संवर्धनासह काेअर झाेनमधील पर्यटन टप्प्याटप्प्याने बंद करण्याच्या नियमाचा समावेश आहे.
-यासह बफर क्षेत्राच्या पर्यटनासाठी केवळ इलेक्ट्रिक वाहनांनाच प्रवेश आहे.
-रिसाॅर्टचे नियमन तसेच वनक्षेत्राला लागून असलेल्या गावातील नागरिकांना राेजगाराला प्राधान्य देण्यास सांगण्यात आले आहे.
-सुरक्षित क्षेत्रात पर्यटनाचा अतिरेक.
-व्याघ्र प्रकल्पाच्या काेअर झाेनमध्ये केवळ २० टक्के पर्यटनाला परवानगी असून, टप्प्याटप्प्याने तेही बंद करण्यास सांगितले आहे.
-सुरक्षित पर्यटनाच्या आड काेअर क्षेत्रात माेठ्या प्रमाणात पर्यटनाला परवानगी देण्यात आली. हळूहळू पर्यटन लाॅबी तयार झाली.
-काेअर क्षेत्रात पर्यटनाचा अतिरेक झाला. काेअर झाेनजवळच श्रीमंतांचे रिसाॅर्ट तयार झाले.
-आतातर रात्रीचे पर्यटनही सुरू करण्याचा घाट घातला जात असून, यामुळे वन्यप्रेमींमध्ये असंताेष आहे.
म्हणून मानव-वन्यजीव संघर्ष
केंद्रीय वने, पर्यावरण व हवामान बदल मंत्रालयाच्या समितीचे सदस्य सुरेश चाेपणे यांच्या मते पर्यटनाच्या अतिरेकामुळे व्याघ्र संवर्धनाच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला जात आहे. व्याघ्र संवर्धन हा मूळ उद्देश बाजूला पडून पर्यटन व महसूल याला प्राधान्य मिळत आहे. मानवी हालचाली वाढल्याने वाघांच्या व इतर वन्यजीवांच्या अधिवासावर फरक पडला.