चार वर्षापासून शंभराव्या नाट्य संमेलनाचा मुहूर्तच सापडेना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2022 08:00 AM2022-12-01T08:00:00+5:302022-12-01T08:00:02+5:30

Nagpur News मार्च २०२३ मध्ये नियामक मंडळाच्या कार्यकारिणीचा कार्यकाळ संपणार आहे. मात्र, २०२१ मध्ये झालेल्या ताटातुटीनंतर नेमका कोणता गट नाट्य परिषद चालवतो, हाच प्रश्न सभासदांच्या मनात निर्माण झाला आहे.

The time for the hundredth theater meeting has not been found for four years! | चार वर्षापासून शंभराव्या नाट्य संमेलनाचा मुहूर्तच सापडेना!

चार वर्षापासून शंभराव्या नाट्य संमेलनाचा मुहूर्तच सापडेना!

googlenewsNext
ठळक मुद्दे१० डिसेंबरला नियामक मंडळाची अखेरची आमसभानेमका कोणता गट चालवतोय नाट्य परिषद?

प्रवीण खापरे 

नागपूर : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या घटनेनुसार २०१८ मध्ये पंचवार्षिक निवडणुकीत गुण्यागोविंदाने सत्तेत आलेल्या नियामक मंडळाची २०२१च्या अखेरपर्यंत ताटातूट झाली आणि आतापर्यंत खुर्चीला खुर्ची लावून बसत असलेल्या मंडळात दोन गट निर्माण झाले. सत्तेत येताच याच नियामक मंडळाने फेब्रुवारी २०१९ मध्ये ९९ वे अ. भा. मराठी नाट्य संमेलन नागपुरात घेतले आणि त्यानंतर मोठ्या जोशात २०२० मध्ये होणाऱ्या शंभराव्या नाट्य संमेलनाची घोषणाही केली. मात्र, ही घोषणा गेली चार वर्षे थंडबस्त्यात गेली आहे. कोरोना आणि नंतर एकमेकांवर कुरघोडीच्या सत्राने शंभराव्या नाट्य संमेलनाची चर्चाच बाद झालेली आहे.

मार्च २०२३ मध्ये नियामक मंडळाच्या कार्यकारिणीचा कार्यकाळ संपणार आहे. मात्र, २०२१ मध्ये झालेल्या ताटातुटीनंतर नेमका कोणता गट नाट्य परिषद चालवतो, हाच प्रश्न सभासदांच्या मनात निर्माण झाला आहे. कारण दोन्ही गट एकमेकांना व एकमेकांच्या निर्णयांना अवैध संबोधत आहेत. प्रसाद (नवनाथ) कांबळी यांना बहुमताने अध्यक्षपदावरून पदच्युत करण्यात आले होते आणि त्यांच्याजागी नरेश गडेकर यांना प्रभारी अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय नियामक मंडळाने घेतला होता. तेव्हापासून कांबळी गट आणि गडेकर गटात तुफान कोर्टकचेऱ्या सुरू झाल्या. दोन्ही गट नाट्य परिषदेचे विश्वस्त शरद पवार यांच्या दरबारी गेले. परंतु, तेथेही संभ्रम कायम राहिल्याने, हा वाद अद्याप शमलेला नाही. त्यामुळे शंभरावे नाट्यसंमेलन चर्चेतूनच बाहेर पडले आहे. दरम्यान, अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे उस्मानाबाद, नाशिक व उदगीर अशी तीन साहित्य संमेलने पार पडली आणि वर्धा येथे होणाऱ्या ९६व्या साहित्य संमेलनाची जय्यत तयारी सुरू झालेली आहे. मात्र, ९९व्या नाट्य संमेलनानंतर पुढचे म्हणजेच शंभरावे नाट्य संमेलन कधी होणार, या प्रश्नाचे उत्तर अजूनही मिळालेले नाही. आता १० डिसेंबर २०२२ रोजी नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाची अखेरची आमसभा मुुंबईमध्ये पार पडणार आहे. या आमसभेतूनच मार्च २०२३च्या पंचवार्षिक निवडणुकीची घोषणा केली जाणार आहे. त्यातही हे दोन्ही गट आमनेसामने येणार असून, नाट्य परिषदेचे राजकारण पुन्हा तापणार असल्याचे दिसून येते.

उन्हाळ्यात शंभरावे नाट्य संमेलन!

- २० नोव्हेंबर २०२२ ला दादर येथील शाहू सहभागृहात पार पडलेल्या नियामक मंडळाच्या सभेत मला स्थायी अध्यक्ष म्हणून मान्यता दिली आहे. त्यानुसार १० डिसेंबरला नियामक मंडळाची अखेरची वार्षिक सर्वसाधारण सभा बोलावली आहे. या सभेतून मार्चमध्ये होणाऱ्या निवडणुकीचा कार्यक्रम सर्वसंमतीने जाहीर केला जाईल. डिसेंबरपासून ही प्रक्रिया सुरू होईल. मार्चमध्ये निवडणूक आटोपल्यानंतर जी कार्यकारिणी बसेल ती कार्यकारिणी उन्हाळ्यात शंभरावे नाट्य संमेलन घेण्यास तयारी करेल.

- नरेश गडेकर, अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद

....................

Web Title: The time for the hundredth theater meeting has not been found for four years!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.