रोजगाराच्या शोधात निघालेल्या बिहारी युवकावर काळाची झडप
By नरेश डोंगरे | Published: January 2, 2024 11:43 PM2024-01-02T23:43:48+5:302024-01-02T23:44:00+5:30
तेलंगाणा एक्स्प्रेसमधून पडून मृत्यू : गाडी थांबवली, मात्र वेळ निघून गेली
नागपूर : कामाच्या शोधात आपले गाव, आपला प्रांत सोडून तो परप्रांतात गेला. तेथे भ्रमनिरास झाल्याने तो राजधानी दिल्लीत रोजगार शोधण्यासाठी निघाला. मात्र, धावत्या गाडीतून तो खाली पडला आणि काळाने डाव साधला. त्याचा मृतदेहच त्याच्या गावाला परत नेण्याची वेळ त्याच्या आप्तस्वकीयांवर आली आहे. मन विषन्न करणारी ही घटना मंगळवारी दुपारी ४ वाजता बुटीबोरी-गुमगावजवळ घडली.
जितेंद्रकुमार सिकंदास (वय १९) असे मृताचे नाव आहे. सूत्रांनुसार, बिहारमध्ये राहणाऱ्या जितेंद्रच्या कुटुंबात आई बहीण आणि एक भाऊ आहे. घरची स्थिती हलाखीची आणि गावात रोजगार नसल्याने जितेंद्र त्याचा चुलतभाऊ विक्रमसोबत काम शोधण्यासाठी दि. २७ डिसेंबरला सिकंदराबादला गेला होता. तेथे मनासारखा रोजगार न मिळाल्याने या दोघांनी दिल्लीला जाऊन काम करण्याचा विचार केला. त्यानंतर ते तेलंगणा एक्स्प्रेसने दिल्लीसाठी निघाले. दुपारी ४च्या सुमारास गाडी बुटीबोरी ते गुमगाव दरम्यान आली असताना अचानक जितेंद्र धावत्या गाडीतून खाली पडला. ही बाब लक्षात येताच प्रवाशांनी चेन ओढून गाडी थांबवली. गंभीर जखमी झालेल्या जितेंद्रला गार्डच्या व्हॅनमध्ये ठेवण्यात आले. गार्डने ही माहिती नागपूर लोहमार्ग पोलिस आणि रेल्वे डॉक्टरला दिली. त्यानुसार, गाडी नागपुरात येताच रेल्वे डॉक्टरने गार्डच्या डब्यात असलेल्या जितेंद्रची तपासणी केली. मात्र, वेळ झाली होती. जितेंद्रचे प्राणपाखरू उडून गेले होते.
काय करावे, कसे करावे?
रोजगाराच्या शोधात सोबत निघालेल्या चुलतभावाचा अशा पद्धतीने अंत झाल्याने विक्रमसिंगला जोरदार मानसिक धक्का बसला आहे. काय करावे, कसे करावे? असे प्रश्न त्याला पडले आहे. अत्यंत हलाखीची स्थिती असल्याने जितेंद्रच्या कुटुंबीयांना इकडे येणे शक्य होणार नाही. त्यामुळे जितेंद्रचे शव तिकडे कसे न्यावे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. रेल्वे पोलिस या संबंधाने चाैकशी करीत आहेत.