गरीबांना जेवण देणाऱ्यांवर आली उपासमारीची वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2023 07:24 PM2023-05-03T19:24:58+5:302023-05-03T19:25:51+5:30
Nagpur News शिवभोजन संचालकांना मागील तीन महिन्यापासून अनुदान प्राप्त न झाल्याने आज त्यांच्यावरच उपासमारीची वेळ आली आहे.
गणेश हूड
नागपूर : शासनातर्फे आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजूंना जेवण मिळावे यासाठी ‘शिवभोजन’ योजना राबवली जाते. मात्र शिवभोजन संचालकांना मागील तीन महिन्यापासून अनुदान प्राप्त न झाल्याने आज त्यांच्यावरच उपासमारीची वेळ आली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे शासनाकडून मार्च महिन्यातच हे अनुदान वितरित करण्यात आले. मात्र अद्याप संचालकांच्या हातात पडलेले नाही. यामुळे केंद्रचालक अडचणीत आले आहेत.
नागपूर शहरात ९७ शिवभोजन केंद्र आहेत. या केंद्रांमधून गरजूंना अवघ्या १० रुपयांत शिवभोजन थाळी मिळते. ही रक्कम बाहेर दिल्या जाणाऱ्या नाश्त्याच्या किमतीपेक्षा कमी आहे. प्रत्येक शिवभोजन थालीसाठी शासनाकडून ४० रुपये अनुदान दिले जाते. केंद्र चालकांना १०० थालीवर महिन्याला ६ हजार रुपये,जीएसटी देखील भरावा लागतो. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रचालकांना यावर्षी जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च आणि एप्रिल महिन्याचे अनुदान मिळालेले नाही. शासनाकडून यासाठी निधी उपलब्ध झाला आहे, मात्र तांत्रिक अडचणीमुळे केंद्रचालकांना तो वितरित करता आलेला नाही. अशी माहित अन्न पुरवठा अधिकारी भास्कर तायडे यांनी दिली.
रात्रीच्या जेवणाचा निर्णय नाही
दिवसा दिले जाणारे शिवभोजन रात्रीच्या वेळी शासकीय रुग्णालयांमध्ये वितरित करण्याचाही प्रस्ताव होता. शासकीय रुग्णालयात उपचारासाठी लांबवरून येणाऱ्या गरीब रुग्णांच्या नातेवाईकांना स्वस्त जेवणाची गरज भासते. अधिकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्रीच्या वेळी ही शिवभोजन देण्याच्या प्रस्तावावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.