टिप्परने दुचाकीला उडवले; काका-पुतणी जागीच ठार, काकू गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2023 12:26 PM2023-06-05T12:26:16+5:302023-06-05T12:27:49+5:30
मौदा-रामटेक मार्गावरील घटना
माैदा (नागपूर): वेगात जाणाऱ्या टिप्परने कट मारताच दुचाकीवरील तिघेही खाली काेसळले. यात काका आणि पुतणीचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर काकू गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर नागपूर शहरातील हाॅस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. ही भीषण घटना माैदा पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील माैदा-रामटेक मार्गावर रविवारी (दि. ४) दुपारी १.१० वाजण्याच्या सुमारास घडली.
शिवदास किसन वंजारी (वय ६०) व श्रुती भीमराव वंजारी (१३) अशी मृत काका व पुतणीचे नाव असून, रेखा शिवदास वंजारी (५५) असे गंभीर जखमी काकूचे नाव आहे. हे तिघेही भूगाव (ता. कामठी) येथील रहिवासी आहेत. तिघेही माेटारसायकल(एमएच-४०/झेड-७२८१)ने भूगावहून माैदा मार्गे नेरला येथे जात हाेते. माैदा-रामटेक राेडवरील पेट्राेल पंपजवळ वेगात आलेल्या टिप्पर(एमएच-४०/एके-०२८५)ने त्यांच्या माेटारसायकलला कट मारला आणि शिवदास यांचा दुचाकीवरील ताबा सुटला. त्यामुळे तिघेही राेडवर काेसळल्याने गंभीर जखमी झाले. यात शिवदास व श्रुतीचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
पाेलिसांनी घटनास्थळ गाठून जखमी रेखा यांना उपचारांसाठी नागपूर शहरातील मेयाे रुग्णालयात हलविले तर दाेन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी माैदा शहारातील ग्रामीण रुग्णालयात आणले. याप्रकरणी माैदा पाेलिसांनी भादंवि २७९, ३३७, ३०४ (अ) अन्वये गुन्हा नाेंदवून टिप्पर चालक आबिद शेख रशिद शेख (३५, रा. आझाद वाॅर्ड, रामटेक) यास ताब्यात घेतले. या घटनेचा तपास सहायक पाेलिस निरीक्षक प्रमोद चौधरी हे करीत आहेत.
बारशाच्या आनंदावर विरजण
शिवदास वंजारी यांच्या नातेवाईक अंजली करंबे (रा. नेरला, ता. माैदा) यांच्याकडे बाळाच्या (मुलगा) बारशाचा कार्यक्रम असल्याने शिवदास, त्यांच्या पत्नी रेखा आणि पुतणी श्रुती कार्यक्रमासाठी नेरला येथे जात हाेते. वाटेत हा अपघात झाल्याने बारशाच्या आनंदावर विरजण पडले. अपघाताला कारणीभूत ठरलेला टिप्पर रिकामा हाेता. माैदा-रामटेक मार्गावर रेती आणि राखेची वाहतूक करणाऱ्या ट्रक व टिप्परची सतत वर्दळ असते. ही वाहने अनियंत्रित वेगाने धावतात.