नशेत आकंठ बुडालेल्या दोन गुन्हेगारांना ट्रेनने चिरडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2022 04:24 PM2022-05-02T16:24:58+5:302022-05-02T16:44:33+5:30
किंकाळी ऐकून बाजूच्या झोपडपट्टीतील मंडळी धावली. त्यांनी अपघाताचे विदारक दृश्य पाहून पहाटे २ च्या सुमारास सदर पोलिसांना कळविले.
नागपूर : नशेत आकंठ बुडालेल्या दोन गुन्हेगारांना ट्रेनने चिरडले. त्यामुळे दोघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला. सोमवारी पहाटे १.३० च्या सुमारास सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. आकाश सुशील मडावी उर्फ झिंग्या आणि नवीन सुनील मसराम उर्फ अध्दापाव अशी या दोघांची नावे आहेत.
झिंग्या आणि अद्धापाव दोघेही सराईत गुन्हेगार होते. ते चोऱ्या, घरफोड्या करायचे आणि रेल्वेलाइनच्या बाजूला रात्रभर विविध अमली पदार्थांचे व्यसन करायचे. नेहमीप्रमाणे रविवारी मध्यरात्र उलटूनही ते खदान परिसरच्या बाजूला रेल्वेलाइनवर दारू आणि व्हाइटनरची नशा करत बसले होते.
दरम्यान, मध्यरात्रीनंतर १ च्या सुमारास नागपूरहून बिलासपूरकडे जाणारी रेल्वे गाडी धडधडत आली. या दोघांवरही एवढी नशा चढली होती की त्यांना मृत्यूच्या रूपाने धडधडत आलेल्या ट्रेनचेही काही वाटले नाही. ते तसेच बसून राहिले अन् रेल्वेगाडीने झिंग्या आणि अद्धापावला धडक देऊन बऱ्याच अंतरापर्यंत फरफटत नेले. किंकाळी ऐकून बाजूच्या झोपडपट्टीतील मंडळी धावली. त्यांनी अपघाताचे विदारक दृश्य पाहून पहाटे २ च्या सुमारास सदर पोलिसांना कळविले. ठाणेदार विनोद चौधरी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. झिंग्या आणि अद्धापावचे मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत पडून होते. पोलिसांनी ते मेयो रुग्णालयात पाठविले. याप्रकरणी सदर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.
झिंग्या होता तडीपार
झिंग्याच्या गुन्हेगारी वृत्तीचा घरच्यांनाही त्रास असल्याने तो बेवारससारखाच राहत होता. त्याचा गुन्हेगारी अहवाल बघता त्याला यापूर्वी पोलिसांनी तडीपारही केले होते. मात्र तो नागपुरातच राहत होता. अद्धापाव झिंग्याचा खास मित्र होता. तोही गुन्हेगारी वृत्तीचा असल्याने त्याच्या त्रासाला कंटाळून त्याची आई चंद्रपूरला निघून गेली होती.