अतिरिक्त लाचेच्या मागणीमुळे फसणार होता ‘ट्रॅप’; ‘एसीबी’ने दिल्या खेळण्यातील नोटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2023 08:00 AM2023-04-29T08:00:00+5:302023-04-29T08:00:07+5:30

Nagpur News शाळेतील वर्गवाढीसाठी लाच घेताना, शिक्षण उपसंचालक कार्यालयातील वरिष्ठ लिपिक व एका शिक्षकाला अटक करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

The 'trap' was going to fall due to the demand for additional bribes; Toy notes given by 'ACB' | अतिरिक्त लाचेच्या मागणीमुळे फसणार होता ‘ट्रॅप’; ‘एसीबी’ने दिल्या खेळण्यातील नोटा

अतिरिक्त लाचेच्या मागणीमुळे फसणार होता ‘ट्रॅप’; ‘एसीबी’ने दिल्या खेळण्यातील नोटा

googlenewsNext

योगेश पांडे

नागपूर : शाळेतील वर्गवाढीसाठी लाच घेताना, शिक्षण उपसंचालक कार्यालयातील वरिष्ठ लिपिक व एका शिक्षकाला अटक करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील आरोपी लिपिक सुनील महादेवराव ढोले (वय ५२) व शिक्षक पवन ईश्वर झाडे (४४) यांची चौकशी सुरू असून, आरोपी लिपिकाने आणखी एका शाळेच्या कामाच्या नावाखाली २५ हजार रुपयांची लाच घेतल्याची बाबही समोर आली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, ऐन वेळी ढोलेने तक्रारदाराकडून आणखी २५ हजार रुपये मागितले. सापळाच फसण्याची शक्यता असल्याने, ऐन वेळी ‘एसीबी’ने तक्रारदाराला खेळण्यातील पाचशे रुपयांच्या नोटा घेऊन पाठविले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. कार्यालयात लाचखोरीचे मोठे रॅकेट असल्याची शंका असून, शिक्षण उपसंचालक कार्यालय याचा अड्डाच बनल्याची ओरड शिक्षण क्षेत्रातून होत आहे.

चंद्रपूर येथील पोद्दार स्कूलच्या शाळेचे प्रतिनिधी असलेल्या एका व्यक्तीने शाळेतील वर्गवाढीसाठी प्रस्ताव पाठविला होता. वर्ग सहावी ते दहावीपर्यंत वर्गवाढ करण्याबाबतचा संबंधित प्रस्ताव होता व तो शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला. या प्रस्तावावर शिफारस करण्यासाठी लिपिक ढोले याने तक्रारदाराला ५० हजार रुपयांची लाच मागितली. एसीबीने तक्रारीनंतर सापळा रचून आरोपींना अटक केली.

प्रत्यक्षात ढोलेला रंगेहाथ पकडण्यासाठी ‘एसीबी’ने सापळा रचला होता व तक्रारदार २५ हजार रुपये घेऊन तेथे पोहोचले. मात्र, ऐन वेळी ढोलेने लाचेची रक्कम घेण्यास नकार दिला. त्याने तक्रारदाराकडून पोद्दार शाळेचे २५ हजार रुपये व चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस येथील शेरॉन पब्लिक स्कूलच्या दर्जावाढीच्या प्रस्तावाच्या कामाचे २५ हजार रुपये मागितले. शेरॉन पब्लिक स्कूलचे पैसे त्याने वेळेवर मागितले व तक्रारदाराकडे तेवढी रोख रक्कम नव्हती. जर पूर्ण रक्कम आणली, तरच स्वीकारेल, अन्यथा दोन्ही प्रस्तावांच्या फाइलमध्ये त्रुटी काढेल, अशी धमकीच ढोलेने दिली होती. यामुळे सापळ्याचे नियोजन पाण्यात जाण्याची चिन्हे होती. मात्र, ‘एसीबी’च्या पोलीस निरीक्षक उज्वला मडावी यांनी खेळण्यातील बनावट पाचशेच्या नोटा अगोदरच्या २५ हजारांमध्ये टाकण्याची सूचना केली. त्यांच्या सूचनेनुसार खेळण्यातील ५० नोटा जमविण्यात आल्या व त्या घेऊन तक्रारदार ढोलेकडे पोहोचले. ढोलेने झाडेकडे पूर्ण रक्कम देण्यास सांगितले व लगेच एसीबीने दोघांनाही रंगेहाथ पडकले.

हे हिमनगाचे टोक, लाचखोरीची पाळेमुळे खोलवर

धंतोलीचे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय भ्रष्टाचार आणि लाचखोरीसाठी कुप्रसिद्ध आहे. या कार्यालयाकडे सहा जिल्ह्यांची जबाबदारी आहे. येथे शिक्षक आणि शैक्षणिक संस्थांशी संबंधित समस्या आणि तक्रारींसह सर्व विषयांचा निपटारा केला जातो. त्यामुळे येथे दररोज मोठ्या प्रमाणात तक्रारी-समस्या किंवा प्रस्ताव येतात. शिक्षण संस्थांमधील शिक्षक व लोकांना कोणतेही काम करण्यासाठी अनेक महिने इकडे तिकडे फिरावे लागते. संबंधित लोक कर्मचाऱ्यांकडे फेऱ्या मारतात व त्यानंतर पैशाची मागणी सुरू होते. काम अडण्याची भिती असल्याने तक्रार करण्यास लोक धजावत नाहीत व त्याचाच फायदा कर्मचारी-अधिकारी घेतात, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

Web Title: The 'trap' was going to fall due to the demand for additional bribes; Toy notes given by 'ACB'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.