मला ट्रोल करणारे ट्रोलर्स हे एमव्हीए आघाडीचे पाच पैशाचे नोकरदार सैन्य !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2022 10:17 PM2022-12-20T22:17:43+5:302022-12-20T22:18:18+5:30
Nagpur News अभिव्यक्ती वैदर्भीय लेखिका संस्थेच्या वतीने आयोजित अभिरूप न्यायालयात अमृता फडणवीस प्रत्येक आरोपाला सडेतोड उत्तर देत होत्या.
नागपूर : माझे स्वत:चे स्वतंत्र विचार आहेत आणि ते व्यक्त होणे मला आवडते. त्याचा कधी मला तर कधी देवेंद्र फडणवीस यांना तोटा सहन करावा लागतो आणि त्यामुळे मी आता किमान व्यक्त होत आहे. मात्र, घाबरत मुळीच नाही. मला ट्रोल करणारे ट्रोलर्स प्रचंड क्रिएटिव्ह आहेत आणि त्यांच्याकडे बराच वेळ असतो. मात्र, ते सारेच महाविकास आघाडीने पाच पैसे देऊन ट्विटरवर धाडलेले सैन्य आहेत. मी माझ्या आईंना (सासूबाई) सोडून कुणालाच घाबरत नसल्याच्या भावना अमृता देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी येथे व्यक्त केल्या.
मंगळवारी श्रीसाई सभागृह येथे अभिव्यक्ती वैदर्भीय लेखिका संस्थेच्या वतीने आयोजित अभिरूप न्यायालयात अमृता फडणवीस प्रत्येक आरोपाला सडेतोड उत्तर देत होत्या. आरोप करणारे जनतेचे वकील अजेय गंपावार होते तर न्यायनिवाडा करणाऱ्या न्यायमूर्ती म्हणून ॲड. कुमकुम सिरपूरकर होत्या. लिपिक म्हणून रश्मी पदवाड-मदनकर यांनी जबाबदारी पार पाडली.
आपल्या वक्तव्यांबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठांकडे तक्रार करण्यात आली होती, हे खरे आहे. मात्र, हे तक्रारदार स्वत: त्यांच्या घरातील स्त्रियांबाबत उदासीन आहेत. आदित्य ठाकरे यांनी देवेंद्रजींना स्त्री अत्याचारी व प्रतिगामी असल्याचे म्हटले तेव्हा माझा तिळपापड उडाला होता आणि म्हणूनच मी त्यांना रेशमाचा किडा म्हणून संबोधले होते. कारण, देवेंद्रजी परिश्रमाने वर आले तर ते कुटुंबाच्या प्रतिष्ठेमुळे. उद्धव ठाकरे यांना कुटुंबातील व्यक्ती या नात्याने भोगी म्हटले होते आणि एक नेतृत्व म्हणून त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगींकडून शिकण्याचे आवाहन केले होते, असे त्यांनी यावेळी मान्य केले.
राजकारणात रस नाही
आपणास राजकारणात सध्यातरी रस नाही. आपली प्राथमिकता मुलगी दिविजा आहे. भविष्यात राजकारणात येईल की नाही, हे आत्ताच सांगू शकत नाही. मी गायिका आहे आणि लहानपणापासून आजी, वडील व इतर गुरूंकडून गाणे शिकते आहे. त्यामुळे मी गाते, असे अमृता फडणवीस म्हणाल्या.