माझ्या कोर्टकचेऱ्या संपल्या, सत्य अजून उघड झाले नाही - पद्मभूषण एस. नाम्बीनारायणन
By प्रविण खापरे | Published: October 9, 2022 05:16 PM2022-10-09T17:16:05+5:302022-10-09T17:17:45+5:30
"मी विक्रम साराभाई, सतीश धवन आणि के.एस. राव यांच्या नेतृत्त्वात ३३ वर्षे इस्त्रोमध्ये एअरोस्पेसच्या विकासात काम केले."
नागपूर - मी माझी ३३ वर्षे इस्त्रोच्या एअरोस्पेस तंत्रज्ञानासाठी घालविले आणि त्याचा मला गर्व आहे. परंतु, बनावट खटला (फॅब्रिकेटेड केस) चालवून संबंधित तत्कालिन केंद्र व राज्य सरकारांनी मोलाची २७ वर्षे वाया घालवली. आता माझ्या कोर्टकचेऱ्या आता संपल्या आहेत. परंतु, या ‘फॅब्रिकेटेड केस’चे सत्य अजूनही जगाला गवसले नसल्याची वेदना देशाचे रॉकेट सायन्टिस्ट व स्वदेशी लिक्विड इंजिन ‘विकास’चे विकासक पद्मभूषण एस. नाम्बीनारायणन यांनी आज येथे व्यक्त केली. हिंदू रिसर्ज फाऊंडेशन व मैत्री परिवार संस्थेच्या वतीने दिला गेलेला ‘आचार्य भारद्वाज’ पुरस्कार स्विकारताना त्यांनी ही भावना व्यक्त केली.
मी विक्रम साराभाई, सतीश धवन आणि के.एस. राव यांच्या नेतृत्त्वात ३३ वर्षे इस्त्रोमध्ये एअरोस्पेसच्या विकासात काम केले. इस्त्रोच्या विकासात या तिघांचे योगदान बहुमुल्य आहे आणि त्याचाच परिणाम म्हणजे आज इस्त्रोची दिसत असलेली प्रगती होय. माझ्यावर नंतर शत्रू देशासाठी गुप्तहेर म्हणून बनावट केस लावण्यात आली आणि अचानक आयुष्यच बदलले. तेव्हाचे केंद्र व राज्य सरकार या फॅब्रिकेटेड केसलाच खरे माणून एकच गाणे गात होते. मात्र, सत्य माझ्या बाजूने होते आणि २७ वर्षाच्या कोर्ट कचेऱ्यांतून एकदा नव्हे तर दोनदा कोर्टाने माझी सत्यता मान्य केली. कोर्ट कचेऱ्यांतून मी मुक्त झालो आहे आणि ऊर्वरित केस कोर्टात आहे. सत्य मात्र अजूनही प्रलंबित असल्याची भावना नाम्बीनारायणन यांनी व्यक्त केली.