रायपूरहून दिल्लीकडे पळणाऱ्या दोन मोस्ट वॉन्टेड आरोपींना धावत्या ट्रेनमध्येच केले जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2023 08:30 PM2023-06-06T20:30:04+5:302023-06-06T20:30:57+5:30
Nagpur News रायपूर (छत्तीसगड) मधून दिल्लीकडे पळून जात असलेल्या दोन मोस्ट वॉन्टेड आरोपींना रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) एस्कॉर्टिंग पार्टीने धावत्या ट्रेनमध्ये पकडले. नंतर त्यांना राजनांदगाव पोलिसांच्या हवाली करण्यात आले.
नागपूर : रायपूर (छत्तीसगड) मधून दिल्लीकडे पळून जात असलेल्या दोन मोस्ट वॉन्टेड आरोपींना रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) एस्कॉर्टिंग पार्टीने धावत्या ट्रेनमध्ये पकडले. नंतर त्यांना राजनांदगाव पोलिसांच्या हवाली करण्यात आले.
सोहेब सिद्दीकी मोहम्मद सिद्दीकी (वय २५) आणि शेज नियाज खान (वय २२) अशी या गुन्हेगारांची नावे आहेत. ते दोघेही रायपूर जिल्ह्यातील वासुदेवपारा, रामकुंड येथील रहिवासी होय.
विविध गुन्ह्यात वॉन्टेड असलेले सोहेब सिद्दीकी आणि शेज नियाज हे दोघे राजधानी एक्स्प्रेसमधून रायपूरहून दिल्लीकडे पळून जात असल्याची माहिती रेल्वे सुरक्षा दलाचे विभागीय आयुक्त पंपज चुघ यांना मिळाली होती. त्यांनी राजधानी एक्स्प्रेसमध्ये कर्तव्यावर असलेल्या एस्कॉर्टिग पार्टीला ही माहिती दिली. त्यांना आरोपींचे फोटोही मोबाइलवर पाठविण्यात आले. त्यानुसार, सहायक उपनिरीक्षक के. के. निकोडे, प्रधान आरक्षक जी. एन. रायपूरकर, आरक्षक राजकुमार आणि प्रमोदकुमार यांनी धावत्या ट्रेनमध्ये आरोपींचा शोध सुरू केला. कोच नंबर ८ मध्ये ३९ नंबरच्या सीटवर आरोपी सोहेब सिद्दीकी आणि शेज नियाज बसून दिसले. त्यांची ओळख पटवून त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर या दोघांना राजनांदगाव रेल्वेस्थानकावर उतरवून तेथील पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
अट्टल चोरटे
आरोपी सोहेब आणि नियाज हे दोघे अट्टल चोरटे असून त्यांच्यावर कोतवाली पोलिस ठाण्यासह विविध ठिकाणी गुन्हे दाखल असल्याचे समजते.
----